दारूबंदी कायद्यांतर्गत शेकडो दारूविक्रेत्या महिलांवर कारवाई
By Admin | Updated: August 23, 2015 01:57 IST2015-08-23T01:57:14+5:302015-08-23T01:57:14+5:30
१ एप्रिलपासून दारूबंदी विरोधात धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात असून या मोहिमेंतर्गत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

दारूबंदी कायद्यांतर्गत शेकडो दारूविक्रेत्या महिलांवर कारवाई
सहभाग वाढला : कमी श्रमात पैसा मिळत असल्याने आकर्षण
गडचिरोली : १ एप्रिलपासून दारूबंदी विरोधात धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात असून या मोहिमेंतर्गत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांचा अवैध दारूविक्रीत सहभागावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कमी खर्चात अधिक पैसा मिळविण्याचे साधन म्हणून दारू व्यवसायाकडे बघितले जात असल्याने या व्यवसायात महिलांची संख्या वाढत चालली आहे.
गडचिरोली हा देशातील अतिमागास जिल्हा असून या जिल्ह्यात कोणतेही उद्योग नाहीत. त्यामुळे नक्षलवाद वाढत चालला आहे, असा युक्तीवाद सातत्याने केला जातो. १९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतर गावागावांत दारूचा अवैध व्यवसाय फोफावला. अत्यंत कमी मेहनतीत भरघोस पैसा मिळवून देणारा राजरोस मार्ग म्हणून दारूच्या अवैध धंद्याकडे वृद्धांपासून तरूणांपर्यंत सर्व वर्गातील लोक जुळले. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला आहे. आपल्या पतीसोबतच अनेक महिला दारूची अवैध विक्री करीत असल्याचे धक्कादायक वास्तव गडचिरोली जिल्ह्यात आता उजेडात आले आहे. घरपोच दुचाकीच्या सहाय्याने दारू पोहोचविण्याचे काम महिला करीत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने १ एप्रिल २०१५ पासून अवैध दारूविक्रीविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १५२ कारवाया करून ३५८ पुरूष आरोपींना तर जवळपास १०० महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांकडून ९३ लाख ३८ हजार ४९७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नऊ चारचाकी वाहने व १९ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहे. आतापर्यंत मागील चार महिन्यांत १०० पेक्षा अधिक महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे दारूमुळे महिलांना सामाजिक जीवनात त्रास होतो, असा दावा करणाऱ्या महिला संघटनाही महिलांचा दारूविक्रीतील सहभाग पाहून चकरावून गेल्या आहेत. अनेक चांगल्या घरच्या महिलाही वाहनाद्वारे जिल्ह्यात दारूविक्री करीत असल्याने ग्राहकांची त्यांच्याकडे जोरदार गर्दी आढळून आल्याचे भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले.
महिलांचा अवैध धंद्यात सहभाग वाढल्यामुळे शेतीसारख्या व्यवसायात परिश्रम करण्यासाठी महिला मजूर ग्रामीण भागात मिळेनासे झाले आहेत. गडचिरोली शहरासह तालुका मुख्यालयात अनेक दुकानांवर नोकर पाहिजेच्या पाट्या लावल्या आहेत. दुकानदार पाच हजार रूपये महिना द्यायला तयार असतानाही त्यांना महिला व पुरूष सेल्समन मिळत नसल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)