फसवणूक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

By Admin | Updated: April 5, 2015 01:51 IST2015-04-05T01:51:53+5:302015-04-05T01:51:53+5:30

शहरातील रामनगर येथील शबाना जावेद पठाण या महिलेने भावनिक मुद्दा पुढे करून तसेच वेगवेगळ्या योजनेंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष ..

Take action against the culprits by investigating fraud cases | फसवणूक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

फसवणूक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील रामनगर येथील शबाना जावेद पठाण या महिलेने भावनिक मुद्दा पुढे करून तसेच वेगवेगळ्या योजनेंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील तब्बल १० महिलांकडून जवळपास एक कोटी रूपये हडपले. महिला या संदर्भात पठाण हिच्याकडे विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तरे पठाणकडून मिळत आहेत. त्यामुळे या गंभीर फसवणूक प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या शबाना पठाण यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या महिला बचत गट सेलच्या जिल्हाध्यक्ष अमिता मडावी (लोणारकर) यांच्यासह उपस्थित महिलांनी केली.
यावेळी माहिती देताना छाया नागोसे म्हणाल्या, शबाना पठाण यांनी माझ्या मुलीच्या एफडीमधील पैसे काढून देतो तसेच नगर पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शुभमंगल योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवून सुरूवातीला १० हजार त्यानंतर १५०० असे करून टप्प्याटप्प्याने १७ लाख रूपये माझ्याकडून हडप केले. मी व माझ्या कुटुंबीयांनी बचतगट व इतर ठिकाणी बचत असलेला पैसा काढून शबाना पठाण यांना दिला. मात्र मागणी करूनही १७ लाखापैकी एकही पैसा परत मिळाला नाही. याशिवाय शबाना पठाण यांनी ललिता राहाटे यांची ३ लाख ५० हजार, ताराबाई रामटेके यांची २ लाख ३० हजार तर रेखा देवाळकर यांची ४ लाख ३० हजार, बिलकिस माबूद काझी यांची १ लाख २० हजार, बबिता घरडे यांची ७० हजार, छबीता मेश्राम यांची ४० हजार, सुशिला आलाम यांची दीड लाख, देवराव राऊत यांची साडेचार लाख, सेवंता राऊत यांची दीड लाख रूपयांनी आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आम्ही सर्व महिला गेलो, मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही, असा आरोपही उपस्थित महिलांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शबाना पठाण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन १६ मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती महिलांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बकुळा नागोसे, उषा ढोके, सुशीला आलाम, शेवंता राऊत आदी उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Take action against the culprits by investigating fraud cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.