४०० घे पण युरिया दे!

By Admin | Updated: September 13, 2014 23:52 IST2014-09-13T23:52:40+5:302014-09-13T23:52:40+5:30

तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला युरिया खताची रॅक आलेली आहे. जिल्ह्यात सध्या २६०० मेट्रिक टन युरिया खत पोहोचला आहे. विलंबाच्या पावसाने अनेक

Take 400 but give urea! | ४०० घे पण युरिया दे!

४०० घे पण युरिया दे!

गडचिरोली : तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला युरिया खताची रॅक आलेली आहे. जिल्ह्यात सध्या २६०० मेट्रिक टन युरिया खत पोहोचला आहे. विलंबाच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी ३० आॅगस्टनंतर धानपिकाची रोवणी केली. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने धानपीक आता जमिनीच्यावर डोलू लागले आहे. त्यामुळे धानाला युरिया देण्यासाठी बळीराजा तडफडत आहे. युरियाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा व सर्वात स्वस्त खत असल्याने लहान शेतकरीही युरियाच्या खरेदीसाठी आकांड तांडव करीत आहेत. यासाठी कृषी केंद्र चालक मागेल तेवढे पैसे बॅगसाठी देण्याची त्यांची तयारी आहे, असे काहीसे वास्तव लोकमतने शुक्रवारी दिवसभर केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले. शेतकरीच जादा पैसे देण्यास तयार असल्याने कृषी केंद्र चालकही अतिशय आनंदी व समाधानी असल्याचे दिसून आले. एकूणच हा शेतकरी व कृषी केंद्र चालकाचा ‘आतबट्ट्यातील व्यवहार’ असल्याचे स्पष्टपणे जाणवले.
सहकारी व निमसहकारी संस्था परफेक्ट
जिल्ह्यात २६०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. कृषी केंद्रांसोबतच विदर्भ मार्केटींग फेडरेशन, विविध सहकारी संस्था, सहकारी भात गिरण्या यांच्या माध्यमातून युरीया खताची विक्री सुरू आहे. या ठिकाणी लोकमतने भेट दिली. तर केवळ ३०० रूपये दराने युरियाची बॅग विकली जात असल्याचे दिसून आले. सायकलवर दोन बॅग टाकून धानोरा रोडकडे जाणाऱ्याही एका शेतकऱ्याला लोकमतने काय भावाने युरिया घेतला, अशी विचारणा केली तर सहकारी भात गिरणीतून ३०० ला एक बॅग घेतली, अशी माहिती त्याने अप्पलवार हॉस्पिटलसमोर बोलताना दिली. तसेच व्हीसीएमएसमध्ये ३०० रूपयाची पावतीसुध्दा दिली जात होती, असे दिसून आले.
माडेतुकूम गावात अशी होती परिस्थिती
१ वाजून १० मिनिटांनी लोकमतचा प्रतिनिधी चामोर्शी मार्गावरील विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या गोदाम परिसरात युरियाच्या वाहतुकीची माहिती घेण्यासाठी पोहोचला. येथे छायाचित्र घेण्यास सुरूवात केल्यानंतर त्यावेळी तेथे उपस्थित एका शेतकऱ्यांने येथे वाजवी दरात युरियाची विक्री सुरू आहे, अशी माहिती देत जादा भावाने युरीयाची विक्री गडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम या गावात सुरू आहे, अशी माहिती दिली व लोकमतच्या चमूला घेऊन ते स्वत: माडेतुकूम गावापर्यंत आले. माडेतुकूममध्ये मात्र जोरदार काम सुरू होते. युरीयाची एक बॅग ४०० रूपये दराने विकल्या जात होती. ‘घेशील तर घ्या नाही तर चालते व्हा’ असा सरळ ठोक व्यवहार होता. शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘४०० घे बावा पण युरिया दे’ अशी त्यांची आर्जव विनंती होती. ‘अजी युरिया घ्याच लागते, आता पैशाकडे पाहिल्याने जमत नाही’ असे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतच्या चमूशी बोलताना सांगितले. त्यानंतर येथूनच लोकमतच्या चमूने जिल्हास्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. मात्र शनिवारी कार्यालयात सुटी असल्याने कुणीही उपलब्ध नव्हते व त्यांचे मोबाईलही स्वीचआॅफ होते.

Web Title: Take 400 but give urea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.