तहसीलवर विशाल मोर्चा धडकला

By Admin | Updated: April 21, 2016 01:40 IST2016-04-21T01:40:43+5:302016-04-21T01:40:43+5:30

सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने

Tahsilwar giant march | तहसीलवर विशाल मोर्चा धडकला

तहसीलवर विशाल मोर्चा धडकला

लोह प्रकल्प तालुक्यातच करा : बाजारपेठ कडकडीत बंद; १० हजार नागरिक सहभागी
एटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार व राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात हजारो लोकांचा मोर्चा बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयावर धडकला.

या विशाल मोर्चाचा प्रारंभ दुपारी २ वाजता राजीव गांधी शाळेच्या प्रांगणातून झाला. मुख्य मार्गावरून सदर मोर्चा एसडीओ व तहसील कार्यालयावर धडकला. दरम्यान, मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांच्याकडे सादर केले.
या मोर्चाची सांगता दुपारी ४ वाजता करण्यात आली. मोर्चादरम्यान बुधवारी एटापल्ली शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. कडक उन्हात एटापल्ली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आठ ते दहा हजार आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आमदार विजय वडेट्टीवार व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले.
या मोर्चात जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सगुना तलांडी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. लालसू नरोटे, सैनू गोटा, राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी पं.स. उपसभापती लालसू आत्राम, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, मुस्ताक शेख, चंद्रा कवडो, डोलेश मडावी, अभय पुण्यमूर्तीवार, मंगेश नरोटे, रमेश गंपावार, रामजी कत्तीवार, जितेंद्र टिकले, सुरेश तलांडे, संतोष आत्राम, मनोहर हिचामी, दौलत दहागावकर, संजय चरडुके, नसरू शेख, मुक्तेश्वर गावडे, सरीता राजकोंडावार, कमल हेडो, बबिता मडावी, रामसाय तलांडे, ऋषी पोरतेट, उषा ठाकरे, ललिता मट्टामी, सगुना कोडापे, बालाजी आत्राम, शालिक गेडाम, कैलाश कोरेत, मंगूजी मट्टामी, रामजी गुम्मा आदीसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

उत्खननाच्या कामात कंपनीला सरकारकडून मदत - वडेट्टीवार
संपूर्ण कायद्याचे उल्लंघन करून खासगी कंपनी सुरजागड लोह पहाडीवरून कच्चा माल चोरून नेत आहेत. या कामात कंपनीला भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार मदत करीत आहे. विद्यमान सरकारचे डोके ठिकाणावर नाही. आदिवासी जनतेच्या विकासाबाबत भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारला काहीही देणे-घेणे नाही, असे आमदार विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सुरजागड लोह प्रकल्प पहाडी परिसरातून सुरू असलेल्या लोहखनिज उत्खननाच्या मुद्यावर आमदार वडेट्टीवार यांनी भाजप प्रणित सरकारवर प्रखर टीका केली.

या आहेत मागण्या
सुरजागड प्रकल्प एटापल्लीतच उभारण्यासंबंधी भूमिका स्पष्ट होत नाही, तेव्हापर्यंत सुरजागड पहाडीवरील कामे बंद करून कच्च्या लोहखनिजाची वाहतूक तत्काळ बंद करावी, शासनाच्या नियमाचे उलंघन करून जितकी झाडे संबंधित कंपनीने रस्ता बनविण्यासाठी व खोदकामात तोडली आहे. त्याच्या १० पट झाडे पुन्हा लावावीत. अन्यथा कंपनीसोबत केलेला करार रद्द करावा, ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात खनिज आहे, त्या खनिजाचे ग्रामसभेच्या मंजुरीविना उत्खनन व वाहतूक करण्यात येऊ नये. गौण खनिजाचे उत्खनन केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर महसूल व वन विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करावे.

Web Title: Tahsilwar giant march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.