शिक्षकांचे आंदोलन स्थगित
By Admin | Updated: May 14, 2017 01:47 IST2017-05-14T01:47:53+5:302017-05-14T01:47:53+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी,

शिक्षकांचे आंदोलन स्थगित
खासदारांची भेट : दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटना
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने ९ मे पासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून साखळी उपोषणाला प्रारंभ केला. या उपोषणाची शनिवारी सांगता करण्यात आली.
खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, भारत खटी, केशवराव भांडेकर, मधुकर भांडेकर, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. खा. अशोक नेते यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. दुर्गम भागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून खासदारांनी चर्चा केली. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात मार्ग काढण्यास सांगितले. आ. डॉ. देवराव होळी यांनी ग्राम विकास विभागाचे सचिव यांची १६ मे रोजी मुंबई येथे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एम. एन. चलाख यांनी बाजू मांडली. मुदतवाढ घेऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उपोषणकर्ते शिक्षक वाय. एम. खोब्रागडे, के. वाय. मांडवे, प्रशांत पुडकलवार, जे. वाय. मडावी, एन. पी. ठुरके, हेमंत चावरे यांना मान्यवरांनी लिंबूपाणी पाजले. उपोषण स्थळाला जि. प. सदस्य अजय कंकडालवार यांनीही भेट दिली होती. आंदोलनाला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईक शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, कास्ट्राईब कल्याण महासंघ व दुर्गम भागातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.