वसतिगृह अधीक्षक निलंबित
By Admin | Updated: January 11, 2015 22:51 IST2015-01-11T22:51:13+5:302015-01-11T22:51:13+5:30
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले.

वसतिगृह अधीक्षक निलंबित
गडचिरोली : प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले. या संदर्भात गृहपालाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर चौकशीअंती प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी आरमोरी वसतिगृहाचे गृहपाल आर. एस. मैंद यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील अप्रामाणिक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर व वित्त व नियोजन अधिकारी डी. बी. खडतकर यांनी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला गुप्त भेट दिली होती. या भेटीत वसतिगृहाचे अधीक्षक मैंद यांनी तब्बल ७९ विद्यार्थी वसतिगृहात गैरहजर असताना त्यांना पटावर उपस्थित दाखविले होते. या संदर्भात प्रकल्प अधिकारी शिवशंकर यांनी अधीक्षक मैंद व संबंधीत भोजन कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी वसतिगृह व शासकीय आश्रमशाळेला गुप्त भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)