जुन्या जागी रूजू न होणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा
By Admin | Updated: May 11, 2015 01:23 IST2015-05-11T01:23:59+5:302015-05-11T01:23:59+5:30
दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जुन्या जागी रूजू न होणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा
गडचिरोली : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही बहुतांश शिक्षक रूजूच झाले नाहीत. अशा शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
मे २०१३ नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत सुमारे सहा महिने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. या विरोधात काही शिक्षक संघटनांनी आवाज उठवत शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शासनाने २२० शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. सदर शिक्षकांना २ मे रोजी पंचायत समितीमधून जुन्या जागेवर परतण्यासाठी भारमुक्त करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. काही शिक्षक मूळ आस्थापनेवर रूजू झाले आहेत. मात्र काही अजूनही रूजू झाले नाहीत. अशा शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाने मागितला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २ मे रोजीच शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरी स्थगिती दिली तरी त्यांना जुन्या ठिकाणी रूजू होणे भाग ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही मूळ आस्थापनेवर रूजू न होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)