कन्नमवार यांना निलंबित करा
By Admin | Updated: July 27, 2016 01:54 IST2016-07-27T01:54:01+5:302016-07-27T01:54:01+5:30
बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार यांनी २४ जुलैच्या रात्री रुग्णवाहिकेची तोडफोड केली.

कन्नमवार यांना निलंबित करा
रुग्णवाहिका तोडफोड प्रकरण : अमिता मडावी यांची मागणी
गडचिरोली : बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार यांनी २४ जुलैच्या रात्री रुग्णवाहिकेची तोडफोड केली. याप्रकरणी डॉ. संजय कन्नमवार व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी करा अन्यथा २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बोदलीतील चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.
बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीदरम्यान दारू पिल्यानंतर डॉ. संजय कन्नमवार यांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली. पोलीस व चौकशी अधिकाऱ्यांसमोर त्यांनी रुग्णवाहिका फोडल्याची कबुली सुद्धा दिली. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यांची वैद्यकीय तपासणीसुद्धा त्याचवेळी करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
डॉ. कन्नमवार यांनी शासकीय मालमत्तेची नुकसान केली असल्याने त्यांना तत्काळ अटक करावी, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २७ जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास २८ जुलै रोजी बोदलीतील चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
बोदली ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश निकोडे यांनीसुद्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन डॉ. कन्नमवार व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, एजाज शेख, पोलीस पाटील मनोज कसनवार, ग्रा. पं. सदस्य शोभा निकोडे, लता मडावी, रेणुका निकोडे यांच्यासह बोदली येथील नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)