तंबाखू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:25 IST2019-06-11T22:25:11+5:302019-06-11T22:25:43+5:30
प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांनी ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे.

तंबाखू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांनी ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे.
सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही छत्तीसगड राज्यातून सुगंधीत तंबाखू, चारचाकी वाहनांद्वारे आणला जातो व त्याची विक्री गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांमध्ये केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे एमएच ३३ पीए ९७८९, एमएच १२ जेसी ६३३८, एमएच ३३ वाय ३०८३, एमएच ३३ एच ४४६१ या चार वाहनांचा परवाना निलंबित करावा, असा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं. कृ. कांबळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या वाहनांचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारा वाहन पकडल्यानंतर सदर वाहन सोडून दिला जात होता.
त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वाहनाने सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जात होती. सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही जुमानत नव्हते. मात्र आता या वाहनांचा परवाना निलंबित करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबल्याने सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.