शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होणार

By Admin | Updated: May 21, 2015 01:47 IST2015-05-21T01:47:56+5:302015-05-21T01:47:56+5:30

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे,

Surveys of out-of-school children will be conducted | शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होणार

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होणार

देसाईगंज : बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, नियमित शाळा येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हे हक्क प्राप्त झाले आहेत. परंतु अद्यापही या वयोगटातील अनेक मुले शाळाबाह्य आहेत. या सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात एकाच दिवशी २० जून २०१५ रोजी शाळाबाह्य बालकांचे सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला नाही किंवा ज्याने प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल, असे ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालक म्हणजे शाळाबाह्य बालक असा अर्थ होतो. या व्याख्येनुसार राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आहेत, ही वस्तुस्थित आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे व त्यांना शाळेत आणणे ही जबाबदारी राज्य शासनाबरोबरच संपूर्ण समाजाची आहे. समाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत आल्याशिवाय आणि नियमितपणे शाळेत उपस्थित राहून दर्जेदार शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याला पूर्णत: प्राप्त होणार नाही. समाजातील तळागळातील प्रत्येक बालक शाळेत यावे, शिकावे या महत्त्वाच्या उद्देशासाठी जे विद्यार्थी अजूनही शाळाबाह्य आहेत, त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोणती बालके शाळाबाह्य आहेत, याची निश्चिती झाल्याशिवाय त्यांना शाळेकडे वळविण्याची दिशा आणि प्रयत्न सार्थ होणार नाही.
राज्यातील शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक बालकाची एक दिवशीय पाहणी शिक्षण विभागासह इतर विभागामार्फत करण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या सर्वेक्षणात २० जून २०१५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळपर्यंत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी जावून घेतल्या जाणार आहेत. तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाण व बाजार आदी ठिकाणी फिरून शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Surveys of out-of-school children will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.