भिजलेल्या धानाची केली खासदारांनी पाहणी
By Admin | Updated: January 4, 2015 23:12 IST2015-01-04T23:12:22+5:302015-01-04T23:12:22+5:30
दोन दिवस झालेल्या अकाली पावसाने शेतमाल मोठ्या प्रमाणावर भिजला. खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील भिजलेल्या शेतमालांच्या पोत्यांची पाहणी केली.

भिजलेल्या धानाची केली खासदारांनी पाहणी
चामोर्शी : दोन दिवस झालेल्या अकाली पावसाने शेतमाल मोठ्या प्रमाणावर भिजला. खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील भिजलेल्या शेतमालांच्या पोत्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली व नुकसानीबाबतचा आढावाही घेतला.
बाजार समितीत मोजमाप न होता २५ हजार धानाचे पोते पडले असताना ते पावसाने भिजले. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालाची जबाबदारी घेऊन सदर धान योग्य किमतीत खरेदी करावे व त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार नेते यांनी केली. तसेच बाजार समितीच्या यार्डात उभारण्यात आलेले व्यापारी गाळे खुले करून तेथे शेतकऱ्यांचा माल ठेवण्याची व्यवस्था करून देण्याचे निर्देश खासदारांनी बाजार समितीच्या सचिवांना दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, जिल्हा महामंत्री रामेश्वर सेलुकर, तालुका महामंत्री माणिकचंद कोहळे, रेखा डोळस, बंडू नैताम, रमेश नैताम, किशोर कोठारे, नागोबा पिपरे, सुरेश शेट्टे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व अडते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी खासदारांच्या मार्फतीने वित्तमंत्र्यांकडे निवेदन पाठविले.
(शहर प्रतिनिधी)