सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार
By Admin | Updated: September 7, 2015 01:29 IST2015-09-07T01:29:35+5:302015-09-07T01:29:35+5:30
दिल्ली येथे उद्योगपती टाटा, जिंदाल यांच्याशी सरकारच्या वतीने नुकतीच बैठक पार पडली आहे.

सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार
एटापल्लीत आढावा बैठक : अम्ब्रीशराव आत्राम यांचे आश्वासन
एटापल्ली : दिल्ली येथे उद्योगपती टाटा, जिंदाल यांच्याशी सरकारच्या वतीने नुकतीच बैठक पार पडली आहे. यावेळी सदर उद्योगपतींनी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प उभारण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे उद्योग निर्मितीकरिता केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी पावले उचलत असल्याने सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
रविवारी एटापल्ली येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची आढावा बैठक व जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, पं.स. सभापती दीपक फुलसंगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबुराव गंप्पावार, दीपक सोनटक्के आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, सुरजागड लोहप्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे अभिवचन नामदार आत्राम यावेळी दिले. चार वर्षांच्या कालावधीत एटापल्ली तालुक्यासह जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी आपण निश्चितच पुढाकार घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास विभाग व महावितरण आदी विभागाच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणूनघेतल्या.
या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी पालकमंत्री आत्राम यांच्यासमोर शिक्षण, आरोग्य व रस्ते आदींच्या समस्यांबाबत रोष व्यक्त केला. याप्रसंगी एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयासाठी जिल्हा वार्षिक निधीतून मिळालेल्या नव्या रूग्णवाहिकेचे पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे आधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)