सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होणार

By Admin | Updated: April 16, 2016 01:00 IST2016-04-16T01:00:12+5:302016-04-16T01:00:12+5:30

बहुप्रतीक्षित सूरजागड लोह प्रकल्प उभारण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने आष्टी, अनखोडा व कोनसरी...

Surajgarh Iron project will be done in Gadchiroli district | सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होणार

सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होणार

अशोक नेते यांची स्पष्टोक्ती : राजकारण न करण्याचे आवाहन
गडचिरोली : बहुप्रतीक्षित सूरजागड लोह प्रकल्प उभारण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने आष्टी, अनखोडा व कोनसरी या परिसरात ४०० ते ५०० एकर खासगी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे पदाधिकारी प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, अनिल कुनघाडकर उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, तत्कालीन काँग्रेस-राकाँ आघाडी सरकारने सन २००९ मध्ये एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र असामाजिक तत्त्वामुळे या प्रकल्पाचे काम सात ते आठ वर्ष सुरू होऊ शकले नाही. मात्र भाजपप्रणित केंद्र शासनाने सूरजागड लोह प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्प परिसरातून लोह खनिज उत्खनन व वाहतुकीचे काम लॉयड मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या खासगी कंपनीमार्फत सात ते आठ दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर होणार आहे, अशा अफवा व गैरसमज पसरवून अनेक विरोधी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या कामाला विरोध करीत आहेत. सूरजागड लोह प्रकल्प कामाच्या विरोधात एटापल्ली तालुक्यातील लोकांना भडकविण्याचे कामही काही पुढारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी करीत आहेत.
लोह प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याऐवजी राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, विनाकारण विरोध वाढवून प्रकल्पाचे काम थांबवू नये, असे कळकळीचे आवाहनही खासदार नेते यांनी यावेळी केले. आधिच असामाजिक तत्त्वामुळे या प्रकल्पाचे काम सात ते आठ वर्ष बंद राहिले. पुन्हा या कामास विरोध झाल्यास सदर प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही. सदर प्रकल्प उभारणीमुळे एटापल्ली तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाचे काम होऊ द्यावे, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले.
सूरजागड लोह प्रकल्पासाठी केंद्र शासनाने लॉयर्ड मेटल्स या खासगी कंपनीला एकूण मंजूर झालेल्या ३७४.९० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हेक्टर क्षेत्रातील खनिकर्म वाहतूक करण्याबाबतची परवानगी दिली आहे. सूरजागड लोह प्रकल्पासाठी जवळपास ४०० ते ५०० एकर जागा लागणार आहे. सूरजागड पहाडी परिसरात घनदाट जंगल असून या भागात असामाजिक तत्त्वांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे पहाडी परिसरात सदर प्रकल्प उभारणे सरकारला शक्य होणार नाही. सदर प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी केंद्र शासन व खासगी कंपनीच्या वतीने आष्टी, कोनसरी व अनखोडा या परिसरात खासगी जमीन शोधण्याचे काम गतीने सुरू आहे. १०० ते १५० एकर जागा मिळाली तरी खासगी कंपनी संबंधित ठिकाणी उद्योग उभारणार आहे, अशी माहिती खासदार नेते यांनी यावेळी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Surajgarh Iron project will be done in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.