सुरजागड-गडचिरोली पदयात्रा निघणार
By Admin | Updated: December 12, 2015 03:53 IST2015-12-12T03:53:25+5:302015-12-12T03:53:25+5:30
सुरजागड लोह प्रकल्प एटापल्ली परिसरातच व्हावा, जेणे करून या भागातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल.

सुरजागड-गडचिरोली पदयात्रा निघणार
सुरेश बारसागडे यांची माहिती : लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन होणार
गडचिरोली : सुरजागड लोह प्रकल्प एटापल्ली परिसरातच व्हावा, जेणे करून या भागातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. लोह प्रकल्प व इतर समस्यांच्या मुद्यांवर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती तथा अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने १३ पासून १९ डिसेंबरपर्यंत सुरजागड ते गडचिरोली अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी शुक्रवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड भागातील वन जमिनीची खासगी कंपन्यांना वीज देण्यात येऊ नये, वीज देण्यात आली असल्यास त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुरेश बारसागडे यांनी यावेळी केली. अहेरी उपविभागाच्या सर्वांगिण विकासासाठी कसनसूर, जारावंडी, गट्टा, पेरमिली, जिमलगट्टा व आष्टी या नवीन तालुक्यासह स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करून विदर्भ राज्य अस्तित्वात आणावे, आदींसह विविध मागण्यांसाठी सुरजागड-गडचिरोली अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे, असेही बारसागडे यावेळी म्हणाले. या पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला गट्टेपल्ली ग्रामसभेचे अध्यक्ष घिसू पुडो, वटेगट्टा ग्रामसभेचे अध्यक्ष रामदास नरोटे, एकराखुर्द ग्रामसभेचे अध्यक्ष रानू गट्टा व अहेरी जिल्हा कृती समितीच्या सहसचिव सरिता पुंगाटी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अशी निघणार पदयात्रा
४१३ डिसेंबर रोजी सुरजागडवरून एटापल्ली येथे पदयात्रा पोहोचेल, त्यानंतर एटापल्ली येथील एसडीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. तिथून सदर पदयात्रा आलापल्लीवरून अहेरीला पोहोचेल. येथे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन होईल. अहेरीवरून लगाम, आष्टीवरून १७ डिसेंबरला चामोर्शी येथे पदयात्रा पोहोचेल. या ठिकाणी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन त्यानंतर १९ डिसेंबर रोजी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानासमोर पदयात्रा पोहोचल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. येथून इंदिरा गांधी चौकात ठिय्या आंदोलन झाल्यानंतर सदर पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.