सुरजागड ते कोनसरी उद्योग कॉरिडोर तयार होणार
By Admin | Updated: March 7, 2017 00:45 IST2017-03-07T00:45:54+5:302017-03-07T00:45:54+5:30
सुरजागड पहाडीवर राज्य सरकारने अनेक खासगी कंपन्यांना लोहखनिज उत्खननासाठी लिज दिली आहे. या ठिकाणी काही कंपन्यांनी काम सुरू केले आहे.

सुरजागड ते कोनसरी उद्योग कॉरिडोर तयार होणार
एमआयडीसी घेणार जागा : उद्योग विभागाच्या सचिवासोबत बैठक
गडचिरोली : सुरजागड पहाडीवर राज्य सरकारने अनेक खासगी कंपन्यांना लोहखनिज उत्खननासाठी लिज दिली आहे. या ठिकाणी काही कंपन्यांनी काम सुरू केले आहे. या कामावर लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लवकरच एटापल्ली तालुक्यातील युवकांना तांत्रिक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केली जाणार असून सुरजागड ते कोनसरी यादरम्यान औद्योगिक कॉरीडोर तयार करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
राज्य शासनाच्या उद्योग विभाग व गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्योगासाठी जागा कंपनीकडून मागण्यात आली होती. कंपनीने कोनसरी परिसरात जागेला पसंती दर्शविली होती. त्यानंतर उद्योग विभागाचे प्रधानसचिव अपूर्वचंद्र यांच्या समावेत कंपनीच्या अधिकाऱ्यांची १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक झाली.
या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जागा अधिग्रहण करण्याबाबत कारवाई करेल व नंतर या जागेचा मोबदला घेऊन कंपनीला जागा उद्योगासाठी उपलब्ध करून देईल. या बाबींवर चर्चा झाली व या संदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनालाही सूचना केल्या जातील, असे ठरविण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील स्थानिकांनी एटापल्ली तालुक्यातच उद्योग उभारला गेला पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सुरजागड ते कोनसरी यादरम्यान औद्योगिक कॉरीडोअर तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
यात उद्योग समुहाच्या वतीने एटापल्ली परिसरात कामगार वसाहत, शाळा, दवाखाना आदीसह ट्रान्सपोर्टींग हब व या उद्योगाशी संबंधित विविध छोटे उद्योगधंदे विकसीत करण्यावर भर दिला जाणार आहे. कंपनीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील युवकांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण विनामुल्य देऊनही रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतही तयारी कंपनीने शासनाकडे दर्शविली असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)