सूरजागड पहाडीवर आंदोलन

By Admin | Updated: April 12, 2016 03:54 IST2016-04-12T03:54:24+5:302016-04-12T03:54:24+5:30

तालुक्यातील सूरजागड पहाडीवरून होणाऱ्या लोह दगड उत्खनन व वाहतुकीला एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचा

Surajad hill movement | सूरजागड पहाडीवर आंदोलन

सूरजागड पहाडीवर आंदोलन

एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीवरून होणाऱ्या लोह दगड उत्खनन व वाहतुकीला एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचा विरोध कायम आहे. त्यातच सोमवारी तालुक्यातील ४०० वर नागरिकांनी सूरजागड जनहीत संघर्ष समितीचे सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तब्बल तीन तास पहाडीच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान जेसीबीद्वारे होणारे लोह दगडाचे उत्खनन व ट्रकांमधून होणाऱ्या वाहतुकीचे काम बंद पाडले.
सूरजागड पहाडीवरून लोह दगडाचे उत्खनन बंद करा, या मागणीला घेऊन एटापल्ली, गट्टेपल्ली, बट्टेर, मवेली, कारमपल्ली, मंगेर, कोठी, बांडे, कुदरी, हेडरी, परसलगोंदी, पिपली बुर्गी येथील ४०० वर महिला, पुरूष हेडरी येथे जमले. त्यानंतर हेडरीपासून साडेपाच किमी अंतरावर असलेल्या पहाडीजवळ पोहोचून दुपारी २ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे लोह दगड उत्खनन व वाहतुकीचे काम बंद करावे लागले. यामुळे पहाडी परिसरात जवळपास १० ते १२ ट्रक दिवसभर तसेच उभे होते. सायंकाळी ५ वाजतानंतर सुरेश बारसागडे व काही आंदोलक स्वत:हून हेडरी पोलीस ठाण्यात पोहोचले. या आंदोलकांनी आमच्यावर कारवाई करा, अशी मागणीही केली. दरम्यान पोलिसांनी ४४ जणांचे नावे नोंदवून त्यांना सोडून दिले. ठाणेदार वैभव देशपांडे यांनी कायदा हातात घेऊ नये, असा सल्ला आंदोलक कार्यकर्त्यांना दिला.
या आंदोलनात विजय गावडे, नरेश कवडो, गणेश खेडेकर, मिथून जोशी, शशांक नामेवार, प्रसाद नामेवार, राहुल आदे, कुणाल करमरकर, पायल बारसा, सुनीता पुंगाटी, सचिन खांडेकर, पं. स. उपसभापती केशव पुडो, माजी पं. स. सभापती मंगूजी मट्टामी आदी सहभागी झाले होते.
सूरजागड लोह पहाडीवरील लोह दगडाचे उत्खनन व वाहतुकीच्या विरोधात एटापल्ली तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड अंसतोष निर्माण झाला आहे. यापुढेही आंदोलन तीव्र करणार, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Surajad hill movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.