शेततळ्याने दिला आधार
By Admin | Updated: October 10, 2015 01:36 IST2015-10-10T01:36:48+5:302015-10-10T01:36:48+5:30
गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही.

शेततळ्याने दिला आधार
तीन एकरला लाभ : विदर्भ संघम सिंचन कार्यक्रमातून पिसेवडधात शेतकऱ्याला अच्छे दिन
डी. के. मेश्राम मानापूर/देलनवाडी
गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. पावसाचाही अनियमितपणा वाढत चालला असून शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शेततळ्याने तीन एकर शेतीतील धानपीक वाचविण्यास शेतकऱ्याला मदत झाल्याचे उदाहरण आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावात दिसून आले आहे.
आरमोरी तालुक्यात काही भागाला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होते. मात्र तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतीही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पिसेवडधा भागातही अशीच परिस्थिती होती. या भागात सिंचन सुविधा वाढीस लागव्या म्हणून २०१० मध्ये तत्कालीन मख्ुयमंत्री अशोक चव्हाण यांनी विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रम खास गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू केला. याअंतर्गत शेतकऱ्यांना थेट वैयक्तिक लाभाच्या सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पिसेवडधा येथील भगवान बोरूले या शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाने शेततळे तयार केले. या शेततळ्याच्या पाण्याचा आॅईल इंजिनद्वारे उपसा करून धानपिकाला देण्याची सोय शेतकऱ्याला उपलब्ध झाली. यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. अशावेळी बोरूले यांनी आपल्या शेतातील शेततळ्याचे पाणी उपसून तीन एकरातील धानपीक वाचविले. या शेततळ्यात मत्स्य उत्पादन करण्याचाही भगवान बोरूले यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
आता आपले धानपीक कापणीला आले आहे. केवळ शेततळ्याच्या भरवशावरच यंदा धानपीक वाचविता आले. अन्यथा परिस्थिती कठीण होती, अशी भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.