ओबीसी महामाेर्चाला पक्ष व संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:42+5:302021-02-17T04:43:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला बहुजन ...

ओबीसी महामाेर्चाला पक्ष व संघटनांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे. या माेर्चात बाैद्ध व आदिवासी समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बीआरएसपी’चे जिल्हाध्यक्ष राज बन्साेड यांनी केले आहे. देशात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळाला नाही. हा समाज न्याय हक्कांपासून कायम वंचित राहिला आहे. खऱ्या अर्थाने संविधानिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर केवळ ओबीसीच नाही तर जिल्ह्यातील बौद्ध तसेच आदिवासी समाजानेसुद्धा या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बीआरएसपी’चे जिल्हाध्यक्ष बन्सोड यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा कार्याध्यक्षांचा माेर्चाला पाठिंबा
ओबीसींच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. त्यामुळे या माेर्चात जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी केले आहे.
बहुजन समाज पक्षाचे महामाेर्चाला समर्थन
विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी माेर्चाला बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागासवर्गातील समाजबांधवांनी माेठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बसपाचे प्रदेश सचिव रमेश मडावी, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट यांनी केले आहे.