दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:07+5:302021-07-03T04:23:07+5:30
गडचिराेली तालुक्यातील निवडक महिलांच्या वतीने १०२ गावांचे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आपण छत्रपती शिवाजी ...

दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला साकडे
गडचिराेली तालुक्यातील निवडक महिलांच्या वतीने १०२ गावांचे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने राज्य करता, शिवरायांनी जनतेला दारू पाजली असती का? मग आपण चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी का उठविली? आपले मंत्री गडचिरोली जिल्ह्यात येऊन येथील यशस्वी दारूबंदी उठविण्याची धमकी देऊन का जातात, ही शिवशाही की दारूशाही, असाही सवाल तालुक्यातील गावांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना हे निवेदन लवकर पाठवावे, अशी मागणी महिलांनी तहसीलदारांकडे केली. चंद्रपूरमध्ये जर दारू विक्री सुरू झाली तर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येऊन त्याचा उलट परिणाम होईल. जिल्ह्याच्या सीमेवर दुकाने सुरू होतील. त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदी कायम ठेवून अंमलबजावणी अधिक कडक करण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातून कोणतीही अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येणार नाही याची जबाबदारी शासनाने घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
बाॅक्स
धानोरा व कुरखेडा तालुक्यातूनही निवेदन
चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचा निर्णय अन्यायकारक असून, चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी धानोरा तालुक्यातील ११७ गावांनी ठराव केला आहे. यासंदर्भात तालुक्यातील निवडक महिलांच्या वतीने नायब तहसीलदार दामाेदर भगत यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. कुरखेडा तालुक्यातील १०२ गावांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविले.
020721\02gad_1_02072021_30.jpg
धानाेरा येथे दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करताना महिला.