उपोषणाला १० संघटनांचा पाठिंबा

By Admin | Updated: December 18, 2014 01:08 IST2014-12-18T01:08:41+5:302014-12-18T01:08:41+5:30

२०१३ च्या मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या.

Support of 10 organizations to fast | उपोषणाला १० संघटनांचा पाठिंबा

उपोषणाला १० संघटनांचा पाठिंबा

गडचिरोली : २०१३ च्या मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. यात गैरप्रकार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. बोगस बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे. या शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत जिल्ह्यातील १० संघटनांनी शिक्षकांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाठिंबा जाहीर केलेल्या १० संघटनांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गडचिरोली, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा सेवा संघ, जिल्हा मानवाधिकार संघटना, कॉस्ट्राईब जिल्हा संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, सर्वोदय मित्रमंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ युथ वेल्फेअर व ओबीसी कर्मचारी संघटनांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ. कुंभारे म्हणाले, प्रशासनाने गठित केलेल्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये जिल्ह्यात २२० बोगस बदल्या झाल्याचे सिद्ध झाले आहे. गैरव्यवहार झाल्याच्या बाबीला प्रशासन दुजोरा देत आहे. मात्र याबाबत जि. प. प्रशासन तसेच विभागीय प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लोकशाही शासनप्रणाली ही खेदाची बाब आहे, असे डॉ. कुंभारे यांनी यावेळी म्हणाले.
शिक्षकांच्या उपोषणाबाबत आपण संघटनेच्यावतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. वरिष्ठस्तरावरून कारवाई संदर्भात कोणतेही निर्देश न आल्यामुळे कारवाईची प्रक्रिया हाती घेता आली नाही, असे त्यांनी सांगितल्याचे डॉ. कुंभारे यावेळी म्हणाले. विधानसभेच्या अधिवेशन काळात शिक्षकांचे उपोषण सुरू असल्याने जिल्ह्यातील आमदारांनी बोगस बदल्या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावावी, अशीही मागणी शेषराव येलेकर यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला दादाजी चापले, दादाराव चुधरी, पंडीतराव पुडके, पी. वाय. भांडेकर, डॉ. मुर्लीधर बद्दलवार, मनोहर हेपट, सुखदेव वेठे, भाष्कर नरूले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Support of 10 organizations to fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.