नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा; तेलंगणातील टोळीचा केला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:31+5:30
जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पोलिसांची तुकडी आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान शनिवारी नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, तेलंगणामधून दामरंचामार्गे छत्तीसगडकडे १० नग कार्डेक्स वायरचे बंडल (एकूण लांबी ३,५०० मीटर) आणि इतर नक्षल साहित्य नेले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित ४ इसमांकडून ते साहित्य जप्त करून त्यांना अटक केली.

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा; तेलंगणातील टोळीचा केला पर्दाफाश
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांना हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी लागणारे स्फोटकात वापरले जाणारे साहित्य पुरविणाऱ्या चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यातील दोघे तेलंगणा राज्यातील आहेत. अहेरी तालुक्यातील एक आरोपी पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. हे साहित्य छत्तीसगड राज्यात जात होते, हे विशेष.
प्राप्त माहितीनुसार, जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पोलिसांची तुकडी आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान शनिवारी नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, तेलंगणामधून दामरंचामार्गे छत्तीसगडकडे १० नग कार्डेक्स वायरचे बंडल (एकूण लांबी ३,५०० मीटर) आणि इतर नक्षल साहित्य नेले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित ४ इसमांकडून ते साहित्य जप्त करून त्यांना अटक केली.
नक्षलवाद्यांना हे साहित्य पुरवठा करणाऱ्यांमध्ये राजू गोपाल सल्ला (३१ वर्षे) रा.आसिफनगर, जि.करीमनगर, तेलंगणा, काशिनाथ उर्फ रवि मुल्ला गावडे (२४) रा.भंगारामपेठा ता.अहेरी, साधू लच्चा तलांडी (३०), तसेच मोहम्मद कासिम शादुल्ला रा.बाबुपेठ, आसिफनगर जि.करीमनगर, तेलंगणा या चार आरोपींना घटनास्थळावरून पकडण्यात आले. याशिवाय छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे रा.भंगारामपेठा ता.अहेरी हा फरार झाला आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर अधीक्षक समीर शेख (प्रशासन), तसेच जिमलगट्टाचे एसडीपीओ सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पार पडली.
बॉम्ब, हँडग्रेनेडसाठी वापर
छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षलवादी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. अटकेतील नक्षल समर्थक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या, कार्डेक्स वायरद्वारे बनावट बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी आदी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. येत्या टीसीओसी सप्ताहादरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार होता.