जिल्ह्याला खत पुरवठा होणार
By Admin | Updated: June 28, 2014 23:33 IST2014-06-28T23:33:32+5:302014-06-28T23:33:32+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामास सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहेत. यासाठी खताची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याकरिता जि. प. च्या कृषी विभागाने खताची मागणी केली आहे.

जिल्ह्याला खत पुरवठा होणार
गडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामास सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहेत. यासाठी खताची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याकरिता जि. प. च्या कृषी विभागाने खताची मागणी केली आहे. यानुसार येत्या दोन दिवसात जिल्ह्याला राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स कंपनीमार्फत २६०० मेट्रीक टन खताचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी दिली आहे.
जि. प. च्या कृषी विभागामार्फत तालुका निहाय व कृषी केंद्र निहाय खताचा पुरवठा होणार आहे. नियोजनानुसार अहेरी तालुक्यातील ८ कृषी केंद्रांमध्ये १३६ मेट्रीक टन, आरमोरी तालुक्यातील ७ कृषी केंद्रांमध्ये २६० मेट्रीक टन, चामोर्शी तालुक्यातील ३४ कृषी केंद्रांमध्ये ५९१ मेट्रीक टन, धानोरातील ४ कृषी केंद्रांमध्ये ७५ मेट्रीक टन, गडचिरोलीतील ११ कृषी केंद्रांमध्ये ४३० मेट्रीक टन, कोरचीमधील २ कृषी केंद्रांमध्ये ३० मेट्रीक टन, कुरखेडामधील ११ कृषी केंद्रांमध्ये २२८ मेट्रीक टन, मुलचेरामधील १६ कृषी केंद्रांमध्ये २१० मेट्रीक टन, सिरोंचामधील २२ कृषी केंद्रांमध्ये ३२१ मेट्रीक टन, देसाईगंजमधील ८ कृषी केंद्रांमध्ये २६५ मेट्रीक टन, एटापल्ली तालुक्यातील कृषी केंद्रांना १० मेट्रीक टन व भामरागड तालुक्यातील २ कृषी केंद्रांमध्ये २० मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आहे.
शेतकरी गटांना देसाईगंज येथील रेक पार्इंटवरून शेतकरी गटाच्या गावांपर्यत खत पोहोचविण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी प्रती बॅग २८४ रूपये किंमतीनुसार खताची मागणी कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ नोंदवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात खताची टंचाई भासणार नसल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)