उन्हाळी धानावर किडीचे संकट

By Admin | Updated: May 10, 2015 01:21 IST2015-05-10T01:21:02+5:302015-05-10T01:21:02+5:30

देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे.

Summer Pest Pest Crisis | उन्हाळी धानावर किडीचे संकट

उन्हाळी धानावर किडीचे संकट

आरमोरी : देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक ऐन कापणीसाठी तयार होत असताना धानपिकावर कडाकडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह या धरणाचे पाणी आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा तालुक्याच्या काही गावांना पुरविले जाते. सदर धरण मोठे असल्याने खरीप हंगामासोबतच उन्हाळी धानपिकासाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये दरवर्षीच मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर अधिक धानाची लागवड करण्यात आली.
दरवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाचा तडाखा कमी असल्याने धानपीक जोमात आले होते. त्यामुळे यावर्षी चांगले पीक येईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत होता. मात्र अचानक या धानपिकावर कडाकडपा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगाने आरमोरी तालुक्यातील शिवनी भागातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यात आले आहे. या रोगामुळे धानपीक करपल्यासारखे दिसून येत आहे. धानपीक करपल्याने त्याला लागलेले लोंबही भरत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे.
रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली. मात्र रोग आटोक्यात न येता हळूहळू त्याचा विस्तार व प्रभाव वाढतच चालला आहे. कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च झाले आहेत. ऐन कापणीसाठी धान तयार होत असताना कडाकडपा रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले धानपीक करपतेवेळी शेतकऱ्यांना बघावे लागत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात केवळ या तिनच तालुक्यांमध्ये उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. हे धान विकून शेतकरी खरीप हंगामाच्या खर्चाची तजविज करतात. मात्र हजारो रूपये खर्च करूनही धानपीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

कृषी विभागाचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषिसेवक नेमण्यात आले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊनही एकही कृषिसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कृषिकेंद्र मालकाला विचारून त्याच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत रोग आटोक्यात आला नाही. अशा संकटाच्या वेळी कृषिसेवक मार्गदर्शन करीत नसतील तर त्यांचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कृषिसेवकांना प्रत्यक्ष बांधावर पाठवून मार्गदर्शन करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Summer Pest Pest Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.