सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धानपीक रोवणीला वेग
By Admin | Updated: February 7, 2017 00:44 IST2017-02-07T00:44:33+5:302017-02-07T00:44:33+5:30
सिरोंचा तालुक्यात खरीप धान पिकाबरोबरच उन्हाळी धान पिकाचीही लागवड केली जाते. मागील १५ दिवसांपासून उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे.

सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धानपीक रोवणीला वेग
तीन हजार हेक्टरवर लागवड : शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त; यावर्षी क्षेत्र वाढले
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात खरीप धान पिकाबरोबरच उन्हाळी धान पिकाचीही लागवड केली जाते. मागील १५ दिवसांपासून उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे.
सिरोंचा तालुक्यातील वडधन, अंकिसा, आसरअल्ली व सिरोंचा शहरासभोवतालच्या गावांमध्ये उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. सिरोंचा भागात भूजलपातळी मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरातील शेतकरी शेतात बोअरवेल खोदून या बोअरवेलच्या पाण्याच्या मदतीने उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतात. सिरोंचा तालुक्यात हवामान धानपिकासाठी योग्य असल्याने बहुतांश शेतकरी धानपिकाचीच लागवड करण्यास पसंती दर्शवितात. खरीप हंगामात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. खरीपातील धानपीक निघताच उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यास सुरूवात होते. १५ दिवसांपूर्वी टाकलेले धानाचे पऱ्हे रोवण्यासाठी तयार झाल्याने शेतकरी वर्ग धानाची रोवणी करण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उन्हाळी धान पिकाला तेलंगणा राज्यात मोठी मागणी आहे. गोदावरी नदीवर कालेश्वरदरम्यान पूल झाल्याने सिरोंचातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे धानपिकाला चांगला भावही मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानपिकाखालील क्षेत्र वाढले असल्याचा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धान पिकाची लागवड होणाऱ्या शेतातील बांध्यांमध्ये पाणी भरून ठेवले जात असल्याने पावसाळ्या प्रमाणे शेती दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
कुपनलिकांद्वारे सिंचन
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतामध्ये कुपनलिका (बोअरवेल) खोदल्या आहेत. या कुपनलिकांच्या मदतीने धानपिकाला सिंचन उपलब्ध करून दिले जाते. कुपनलिकेवर मोटारपंप बसविण्यात आला आहे. या मोटारपंपांच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात येतो. विहिरींच्या तुलनेत कुपनलिका अधिक आहेत.