पाच हजार हेक्टरवर उन्हाळी धान

By Admin | Updated: February 5, 2016 01:00 IST2016-02-05T01:00:56+5:302016-02-05T01:00:56+5:30

उन्हाळ्यात जल सिंचनाची सुविधा असलेल्या तालुक्यांमध्ये उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते.

Summer paddy on 5,000 hectares | पाच हजार हेक्टरवर उन्हाळी धान

पाच हजार हेक्टरवर उन्हाळी धान

पऱ्हे टाकले, रोवण्याची प्रतीक्षा : देसाईगंज, कुरखेडा व आरमोरीत सर्वाधिक लागवड
गडचिरोली : उन्हाळ्यात जल सिंचनाची सुविधा असलेल्या तालुक्यांमध्ये उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी सुमारे ६ हजार ४१ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे यावर्षी लागवड घटून जवळपास पाच हजार हेक्टरवर धानाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय व आरमोरी, देसाईगंज तालुक्यात येणारे इटियाडोह धरणाचे पाणी हे दोनच सिंचनाचे मोठे स्त्रोत असले तरी काही शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी करून धानपीक पिकवितात.
इटियाडोह हा मोठा जलाशय आहे. या जलाशयातील पाण्याच्या सहाय्याने देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी या तालुक्यांमध्ये धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर सिरोंचा व इतर तालुक्यांमध्येही ज्या शेतकऱ्यांची शेत नदीच्या किनाऱ्यावर आहे, असे शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. मागील वर्षी सुमारे ६ हजार ४१ हेक्टरवर संपूर्ण जिल्ह्यात धानपिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. डिसेंबर महिन्यातच लहान तलाव, नाले आटले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी धानाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या मार्फतीने व्यक्त केली जात आहे. कडक उन्हाचा फटका धान पिकाला बसतो. त्याचबरोबर खरीप हंगामापूर्वी उन्हाळी धान निघावा यासाठी शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यातच पऱ्हे टाकले आहेत. नदीकाठच्या काही शेतकऱ्यांनी रोवणीलासुध्दा सुरूवात केली आहे. या माध्यमातून ग्रामीण जनतेला रोजगार मिळाला आहे.(नगर प्रतिनिधी)

कमी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
खरिपाच्या तुलनेत उन्हाळी धानाला कमी भाव मिळतो. खर्च मात्र तेवढाच येते. यावर्षी खरिपाच्या धानालाच कमी भाव आहे. त्यामुळे उन्हाळी धानाला अत्यंत कमी भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज असून उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत क्षेत्र घटणार
मागील वर्षी गडचिरोली तालुक्यात ५५, चामोर्शी २००, धानोरा ३०, मुलचेरा ४६, देसाईगंज ३ हजार ४३२, आरमोरी ७१४, कुरखेडा ४०० व सिरोंचा तालुक्यात १ हजार १४९ हेक्टर असे एकूण ६ हजार ४१ हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही लहान तलाव तसेच बोड्या आटल्या आहेत. तर काही आटण्याच्या मार्गावर आहेत. इटीयाडोह धरणामध्येही पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Summer paddy on 5,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.