दोन महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
By Admin | Updated: February 12, 2015 01:09 IST2015-02-12T01:09:47+5:302015-02-12T01:09:47+5:30
पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी १ किलो ६५० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला.

दोन महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
कुरखेडा : पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी १ किलो ६५० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला. तसेच अतिरिक्तस्त्राव होणाऱ्या महिला रुग्णांवर गर्भाशयाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन महिला रुग्णांना जीवनदान दिले.
पोटाचा विकार असलेल्या एका विवाहीत महिला रुग्णाला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिला असह्य वेदनेने त्रस्त होती. येथील डॉक्टरांनी सदर महिला रुग्णाची तपासणी केली असता, महिलेच्या पोटात मांसाचा मोठा गोळा असल्याचे निष्पन्न झाले. पाच ते सहा वर्षांपासून या महिलेच्या पोटात हा गोळा असल्याने त्याचा आकार वाढत गेला. या महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला इतरत्र हलविणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी निर्णय घेऊन या महिला रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.
गर्भाशयातील रक्तस्त्रावाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करून महिलेचे गर्भाशय यशस्वीरित्या बाहेर काढले. या दोन्ही शस्त्रक्रियेसाठी प्रसूतितज्ज्ञ डॉ. दीपचंद सोयाम, बधिरीकरण तज्ज्ञ मदनकर, डॉ. संभाजी ठाकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.