अनुदानातून मिळाले १७ कोटी

By Admin | Updated: May 1, 2015 01:27 IST2015-05-01T01:27:54+5:302015-05-01T01:27:54+5:30

स्थानिक नगर परिषदेला विविध योजनांच्या माध्यमातून २०१४-१५ या वर्षात सुमारे...

Subsidy was received from 17 crores | अनुदानातून मिळाले १७ कोटी

अनुदानातून मिळाले १७ कोटी


गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेला विविध योजनांच्या माध्यमातून २०१४-१५ या वर्षात सुमारे १६ कोटी ६४ लाख २० हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानातून शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत.
नगर परिषद कराच्या माध्यमातून महसूल गोळा करीत असले तरी ही रक्कम अत्यंत मर्यादित राहत असून यातील बहुतांश निधी दिवाबत्ती, पाणीपुरवठा, शहराची स्वच्छता यावरच खर्च होते. त्यामुळे मोठी विकास कामे करायची असल्यास शासनाच्या अनुदानाची वाट बघावी लागते. राज्य व केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे अनुदान वितरित करते. या अनुदानातून विविध विकास कामे केली जातात. काही अनुदान मात्र शासनाने घालून दिलेल्या अटीनुसारच खर्च करावे लागते.
गडचिरोली नगर परिषदेला २०१४-१५ या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ५० लाख ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. केंद्रीय शहर विकास योजनेतून ६८ लाख रूपये मिळाले. शहराच्या स्वच्छतेत नालीचे अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात चांगल्या नाल्या असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक वार्डात नालीचे बांधकाम होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नाली बांधकाम व दुरूस्तीकरिता शासनाकडून अनुदान वितरित केल्या जाते. २०१५-१५ या वर्षात नाली बांधकाम दुरूस्तीसाठी २६ लाख रूपये प्राप्त झाले. दलित वस्त्यांचा विकास व्हावा, दलित नागरिकांना स्वच्छ पाणी, रस्ते, वीज उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने नागरी दलित वस्ती सुधार योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. बहुतांश वस्त्यांमध्ये या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेतून १२ लाख २० हजार रूपयांचा निधी मिळाला आहे. रस्ता अनुदानासाठी ५५ लाख रूपये तर स्थानिक विकास निधीतून ४० लाख रूपये प्राप्त झाले आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत बीपीएलधारक नागरिकांना १०० टक्के अनुदानावर घर बांधून दिल्या जातो. यासाठी एक लाख रूपयांचा अनुदान उपलब्ध करून दिला जातो. २०१४-१५ मध्ये ६५ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत १२ लाख, अल्पसंख्यांक अनुदानातून १५ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. १३ व्या वित्त आयोगातून दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत ५० लाख रूपये मिळाले आहेत. विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या क्षेत्रासाठी मागास क्षेत्र अनुदान निधीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत गडचिरोली शहराला भरीव मदत झाली आहे. सुमारे एक कोटी २५ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. नगरोत्थान अनुदानातून जिल्हास्तरावरच्या योजनेतून सात लाख रूपये, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण गणणेचे तीन लाख, अंगणवाडी केंद्र बांधकामासाठी १० लाख रूपये, सार्वजनिक शौचालय बांधकाम दुरूस्तीसाठी पाच लाख, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून १० लाख, आपत्ती व्यवस्थापनातून पाच लाख असा एकूण सर्वच योजनांवर सुमारे १६ कोटी ६४ लाख २० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत.

Web Title: Subsidy was received from 17 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.