कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: April 27, 2017 01:21 IST2017-04-27T01:21:12+5:302017-04-27T01:21:12+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालयातून जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अतिगंभीर

कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा
महेंद्र मोहबंशी यांची मागणी : बालिका दगावल्याचे प्रकरण
कुरखेडा : येथील उपजिल्हा रूग्णालयातून जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अतिगंभीर अवस्थेत नवजात बालिकेला हलविण्यात येत असताना रूग्णवाहिकेत कोणताच डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे बालिका दगावली, असा आरोप करीत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील रूपलता सुनील उईके या महिलेला २३ एप्रिल रोजी प्रसूतीकरिता उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने रूग्णालयातील परिचारिका मेघा माने हिने ८.२० वाजता १०८ रूग्णवाहिकेला बोलाविले. ९ वाजता रूग्णवाहिका रूग्णालयात हजर झाली. परंतु यावेळी केवळ चालक उपस्थित होता. कोणताच डॉक्टर हजर नव्हता. याच परिस्थितीत चालकांनी रूग्णाला वाहनात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे रवाना झाले. मात्र पोहोचेपर्यंत बालिका दगावली. या घटनेची माहिती मिळताच डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी १०८ रूग्णवाहिका सेवेचे गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याचे समन्वयक डॉ. प्रशांत माटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून येथील सेवेच्या दुरावस्थेची व घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली. डॉ. माटे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र तीन दिवसांचा कालावधी उलटूनही कारवाई झाली नाही, असा आरोप डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)