एक उपअधीक्षक सांभाळतो चार तालुके
By Admin | Updated: February 23, 2015 01:30 IST2015-02-23T01:30:59+5:302015-02-23T01:30:59+5:30
येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकाच उपअधीक्षकाच्या खांद्यावर तब्बल चार तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

एक उपअधीक्षक सांभाळतो चार तालुके
एटापल्ली : येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकाच उपअधीक्षकाच्या खांद्यावर तब्बल चार तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यरत उपअधीक्षकांना १८५ किमी अंतर कापून सेवा देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. एटापल्लीच्या कार्यालयात नऊ पदे रिक्त आहेत. परिणामी या कार्यालयाची यंत्रणा कोलमडली आहे.
एटापल्ली येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एकूण १८ पदे मंजूर आहेत. यापैकी उपअधीक्षक, मुख्यालय सहायक, नगर भू मापण लिपीक, कनिष्ठ लिपीक, दुरूस्ती लिपीक, प्रती लिपीक, अभिलेखापाल व शिपायाचे दोन असे ९ पदे रिक्त आहेत. भामरागड येथील उपअधीक्षक एस. ए. बोरसे यांच्याकडे सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तीन तालुक्याचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे.
भामरागड ते सिरोंचा हे अंतर १८५ किमी आहे. जमिन मोजमाप व जमिन खरेदी, विक्रीचा कारभार सांभाळण्यासाठी बोरसे यांना १८५ किमीचे अंतर कापावे लागत आहे. यात त्यांचा बराच वेळ जात असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. वनहक्क कायद्यांतर्गत जमिन मोजमापाचे काम अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संथगतीने सुरू आहे. या कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)