उपप्रादेशिक व्यवस्थापकासह तिघेजण कारागृहात

By Admin | Updated: August 24, 2016 02:16 IST2016-08-24T02:16:08+5:302016-08-24T02:16:08+5:30

धानोरा तालुक्याच्या सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या २ हजार १०० क्विंटल धानाची चोरी झाल्याचे ...

With sub-regional manager in jail | उपप्रादेशिक व्यवस्थापकासह तिघेजण कारागृहात

उपप्रादेशिक व्यवस्थापकासह तिघेजण कारागृहात

सावरगाव धान चोरी प्रकरण : आरोपी न्यायालयीन कोठडीत
गडचिरोली : धानोरा तालुक्याच्या सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या २ हजार १०० क्विंटल धानाची चोरी झाल्याचे प्रकरण १७ जून २०१६ रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत असून ते सध्या चंद्रपूरच्या कारागृहात आहेत, अशी माहिती सहायक सरकारी वकील अनिल प्रधान यांनी लोकमतला दिली आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये सावरगाव धान खरेदी केंद्राचे व्यवस्थापक शंकर श्यामराव कुमरे, व्यवसाय प्रतवारीकार हरिदास देवाजी उईके व धानोरा कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बाबाराव लक्ष्मण तरासे यांचा समावेश आहे. सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सन २०१४-१५ यावर्षात एकूण ९ हजार क्विंटल धानाची खरेदी केली होती. यापैकी २ हजार १०० क्विंटल धान चोरी गेल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची तक्रार सावरगाव धान खरेदी केंद्राचे व्यवस्थापक शंकर श्यामराव कुमरे यांनी सावरगाव पोलीस मदत केंद्रात दिली. सावरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सदर तीन आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे तक्रारकर्ता सावरगाव धान खरेदी केंद्राचा व्यवस्थापक शंकर कुमरे हा या प्रकरणात आरोपी झाला आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रधान यांनी दिली. याप्रकरणातील आरोपी उपप्रादेशिक व्यवस्थापक तरासे याला २१ जून रोजी गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे यांनी निलंबित केले होते. यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष सावरगाव येथे जाऊन वस्तूस्थिती जाणून घेतली होती. (स्थानिक प्रतिनिधी)

देसाईगंज येथील ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिक कैलास अग्रवाल हे आदिवासी विकास महामंडळाच्या धानाची धानोरा उपप्रादेशिक कार्यालयामार्फत दिलेल्या टीपीनुसार वाहतूक करीत होते. सावरगाव येथील धान चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर सावरगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक जगदाडे व त्यांचे सहकारी पोलीस हे अग्रवाल यांच्या घरी दोन ते तीनदा जाऊन चौकशी केली होती. दरम्यान कैलास अग्रवाल व त्यांची पत्नी रिता अग्रवाल यांची चौकशी केली. मात्र त्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचे आढळून आले नाही. मात्र पोलिसांच्या वारंवार चौकशीमुळे अग्रवाल कुटुंबीय भयभित झाले होते. कैेलास अग्रवाल यांनी गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सावरगावच्या धान चोरी प्रकरणात अग्रवाल यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने रिता अग्रवाल व कैलास अग्रवाल यांना जामीन मंजूर केला, अशी माहिती गडचिरोली न्यायालयाचे सरकारी वकील अनिल प्रधान यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: With sub-regional manager in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.