नक्षलवाद्यांच्या गोळीबारात गडचिरोलीत उपनिरीक्षक व जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:27 IST2020-05-17T18:26:41+5:302020-05-17T18:27:24+5:30
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरातील पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात गडचिरोलीत उपनिरीक्षक व जवान शहीद
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरातील पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.
शिघ्र कृती पथक (क्युआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजतापासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवित होते. ६.३० वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने आणि जवान आत्राम यांचा वेध घेतला. तसेच दसरू कुरचामी हा जवान जखमी झाला. या चकमकीत ४ ते ५ नक्षलवादीही ठार झाले असण्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. या घटनेनंतर अतिरिक्त कुमक पाठवून त्या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले. दुपारी जखमी जवानासह दोन्ही मृतदेह पोलीस दलाकडील हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. सायंकाळी पोलीस दलातर्फे दोन्ही शहीदांना मानवंदना देण्यात आली.
सन्मान स्वीकारण्याआधीच संपले जीवन
पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे सोलापूर जिल्ह्याचे सूपुत्र आहेत. पंढरपूर तालुक्यातील पुळूज हे त्यांचे मूळ गाव असून ते आॅगस्ट २०१७ पासून गडचिरोली येथे कार्यरत होते. उपनिरीक्षक म्हणून त्यांची येथील पहिलीच नियुक्ती होती. या अल्पशा कालावधीत त्यांनी नक्षलविरोधी अभियानात चांगली कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. पण तो सन्मान स्वीकारण्याआधीच त्यांना शहीद व्हावे लागले.