सेमाना ट्रस्टची उपविधी बदविली
By Admin | Updated: January 23, 2017 01:00 IST2017-01-23T00:49:45+5:302017-01-23T01:00:18+5:30
येथील चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानच्या सभासदत्वासाठी सभासद शुल्क म्हणून ११ हजार व वार्षिक वर्गणी पाच हजार रूपये भरावे लागतील.

सेमाना ट्रस्टची उपविधी बदविली
नागपूरच्या कार्यालयात आव्हान देणार : कलंत्री, गडपल्लीवार यांची माहिती
गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानच्या सभासदत्वासाठी सभासद शुल्क म्हणून ११ हजार व वार्षिक वर्गणी पाच हजार रूपये भरावे लागतील. अशा प्रकारची सर्वसाधारण घटकातील नागरिकांना गैरसोयीची नवीन उपविधी श्री क्षेत्र सेमाना देवस्थानची तयार करण्यात आली आहे व या उपविधीला सहायक धर्मदाय आयुक्त गडचिरोली यांनी मान्यता दिली आहे. सदर उपविधी अन्यायकारक असल्याने नागपूर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात आव्हान देण्यात येईल, अशी माहिती सेमाना देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सत्यनारायण कलंत्री व नामदेवराव गडपल्लीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, सार्वजनिक न्यासाचे व्यवस्था व कारभाराबाबत मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था १९५० चे कलम (अ) नुसार सदर नवीन योजना (उपविधी) ही सहायक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव यांनी केली आहे. सदर ट्रस्टच्या कामाच्या गैरव्यवाराबाबत सहायक धर्मदाय आयुक्तांकडे यापूर्वीच तक्रार करण्यात आली आहे. मागील ११ वर्षांपासून संस्थेच्या विश्वस्त मंडळातील विश्वस्तांची कोणतीही सभा घेण्यात आलेली नाही. सभासदाच्या स्वाक्षरी व्यतिरिक्त मनमर्जीने संस्थेचे अध्यक्ष रामस्वरूप काबरा यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे दाखविले आहे. आपल्या मर्जीतील त्र्यंबक रोडे यांना अध्यक्ष व कांतीभाई सूचक यांना सचिव झाल्याचे दर्शविले आहे. कार्यकारीणीत बदल न करताच पद असल्याचे दर्शवून पत्र व्यवहार सुरू केला आहे, असहीे कलंत्री म्हणाले.
सहायक धर्मदाय आयुक्तांवर कारवाई करा
धनदांडग्या सभासदांना हाताशी धरून श्री क्षेत्र सेमाना देवस्थान ट्रस्टच्या नव्या उपविधीचा आदेश गडचिरोलीचे सहायक धर्मदाय आयुक्त प्र. रा. सातव यांनी काढले आहेत. या उपविधीच्या आदेशात अनेक बाबी अन्यायकारक आहेत. मागास व सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींना ट्रस्टचे सभासद होता येत नाही. त्यामुळे संबंधित सहायक धर्मदाय आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कलंत्री व गडपल्लीवार यांनी केली.