सिरोंचा तालुक्यातील डाटाएन्ट्री आॅपरेटर संपावर
By Admin | Updated: January 1, 2015 23:01 IST2015-01-01T23:01:51+5:302015-01-01T23:01:51+5:30
राज्यभरातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी १२ नोव्हेंबरपासून बेमूदत कामबंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला सिरोंचा तालुक्यातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी पाठिंबा दर्शवित कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

सिरोंचा तालुक्यातील डाटाएन्ट्री आॅपरेटर संपावर
सिरोंचा : राज्यभरातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी १२ नोव्हेंबरपासून बेमूदत कामबंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला सिरोंचा तालुक्यातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी पाठिंबा दर्शवित कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचबरोबर सिरोंचा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कोपुलवार यांना निवेदन सुद्धा सादर केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करण्यात आली असून सदर संग्राम कक्ष चालविण्यासाठी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणुकीपासून राज्यभरातील संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही. त्यांना ८ हजार रूपये मानधन देण्याचे करारात स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात मात्र ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये मानधनच त्यांच्या हातावर ठेवले जात आहे. दरदिवशी दाखल्यांचे संगणकीकरण करण्याची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली आहे. कामाचा व्याप खूप असला तरी त्यांना अत्यंत तोकडे मानधन दिले जात आहे.
या सर्व समस्या सोडविण्या याव्या, या मागणीसाठी सिरोंचा तालुक्यातील संगणक परिचालकांंनी ३१ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कामबंद आंदोलनादरम्यान संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे विस्तार अधिकारी कोपुलवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय काटेबोईना, उपाध्यक्ष सपना जोडे, सचिव सत्यम घोष, सदस्य सतिश दागम, श्रीनिवास मुलकला, श्रीनिवास अयल्ला, आनंदराव डुरके, सतिश डोलकला, मैनिका इंदुरी, स्वाती, कार्तिक, प्रशांत कोपुलवार आदी उपस्थित होते. संगणक परिचालकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)