विद्यार्थी अभ्यासणार प्रेरणादायी आत्मचरित्र
By गेापाल लाजुरकर | Updated: August 9, 2023 20:30 IST2023-08-09T20:30:28+5:302023-08-09T20:30:37+5:30
गाेंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

विद्यार्थी अभ्यासणार प्रेरणादायी आत्मचरित्र
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात ‘भुरा’ या शरद बाविस्कर यांच्या आणि ‘आपुलाची वाद आपणांशी’ या चंद्रकांत वानखडे यांच्या आत्मचरित्राची निवड अभ्यासक्रमासाठी केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार सत्र २०२३-२४ ते पुढे ‘ऐच्छिक अभ्यास पत्रिका-२ आत्मचरित्र’ यात या पुस्तकांचा समावेश आहे. हे प्रेरणादायी आत्मचरित्र विद्यार्थी अभ्यासतील.
अलीकडच्या काळातील जगण्याच्या सर्व क्षेत्रांतील मूल्यात्मक संघर्षाला शब्दरूप देणारी व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या या दोन्ही महत्त्वाच्या कलाकृती बहुचर्चित आहेत. शिक्षणातील तत्त्वज्ञान आणि समकाळाचे व्यापक भान देणारी कलाकृती ‘भुरा’, तसेच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या चळवळीतील अनुभवाचे मेटीखेडा येथील कृषी जीवनाच्या विविध मूल्यात्मक प्रयोगाच्या अनुभवावर आधारित राजकीय मूल्यभान देणारी कलाकृती ‘आपुलाची वाद आपणाशी’ तसेच ‘सिंधूताई सपकाळ यांचा संघर्ष’ आणि सामाजिक कामाचा पट उलगडणारे ‘मी वनवासी’ हंसा वाडकर यांचे ‘सांगते ऐका’ हिंमतराव बाविस्कर यांचे ‘बॅरिस्टर कार्ट’, प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’ ही सर्व आत्मचरित्रे आपला दृष्टिकोन समृद्ध करणारी आहेत.