विद्यार्थी विद्यावेतनाला मुकणार
By Admin | Updated: January 13, 2015 23:00 IST2015-01-13T23:00:00+5:302015-01-13T23:00:00+5:30
यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत.

विद्यार्थी विद्यावेतनाला मुकणार
अर्ज भरण्यासाठी तीन दिवस : समाजकल्याण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
गडचिरोली : यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत.
विद्यावेतनासाठीचे अर्ज यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. सदर अर्ज शिष्यवृत्तीच्या अर्जासोबतच भरायचे आहेत. मात्र याबद्दलची माहिती समाजकल्याण विभागाने अत्यंत उशीरा दिली. तोपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून झाले होते. शिष्यवृत्ती अर्ज भरून झाल्यानंतर आता विद्यावेतनाचे अर्ज साफ्टवेअर स्वीकारत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी गडचिरोली समाजकल्याण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यावेतनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅफलाईन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी, शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १६ जानेवारी आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहिल्यास समाजकल्याण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सतिश हेमके, लेनीन राऊत, रूपेश वनकर, सचिन बडोले, सुरज दहेगावकर यांनी दिला आहे.