विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा
By Admin | Updated: December 29, 2014 23:44 IST2014-12-29T23:44:19+5:302014-12-29T23:44:19+5:30
स्थानिक शासकीय मागास वर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून दर रविवारी चामोर्शी शहरातील मुख्य स्थानांची स्वच्छता केली जात असल्याने आजपर्यंत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरविलेले

विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा
चामोर्शी : स्थानिक शासकीय मागास वर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून दर रविवारी चामोर्शी शहरातील मुख्य स्थानांची स्वच्छता केली जात असल्याने आजपर्यंत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरविलेले ही स्थाने आता चकाचक, स्वच्छ व निटनेटके दिसायला लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची गावातील नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे.
शासनाने प्रत्येक गावात, वार्डात व शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. त्यानुसार प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र ही स्वच्छता मोहीम अल्पजीवी ठरली. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली, त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले. हा अनुभव प्रत्येक गावकऱ्यांच्या पाठीशी असताना स्वच्छ भारत अभियान वर्षभर चालविण्याचा निर्धार चामोर्शी येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला. त्यानुसार वसतिगृहाचे अधीक्षक मनोज वडझरकर व भारतीय विकास गृहाचे कर्मचारी तसेच वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी बसस्थानकाची स्वच्छता करण्याचा उपक्रम मागील एक महिन्यापासून हाती घेतला आहे. सदर विद्यार्थी दर रविवारी सकाळच्या सुमारास बसस्थानक, लक्ष्मी गेट परिसर, महात्मा गांधी बालोद्यान परिसर, वसतिगृहाचा परिसर व मुख्य बसस्थानकाची नियमितपणे साफसफाई करीत आहेत.
या सर्व स्थळांवर नागरिकांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणात कचराही जमा होतो. मात्र विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे हा परिसर आता स्वच्छ व निटनेटके दिसू लागला आहे. या उपक्रमात चामोर्शी वसतिगृहातील विद्यार्थी रूपेश संगम, सचिन वाडके, अर्जुन बंशी, सोहेल गेडाम, पवन धोती, जगदीश भांडेकर, केशव गुंडावार, मारोती गट्टीवार आदी सहभागी झाले आहेत. या उपक्रमाची प्रशंसा होत आहे. (शहर प्रतिनिधी)