शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनीच ठोकले शाळेला कुलूप
By Admin | Updated: August 22, 2015 01:50 IST2015-08-22T01:50:48+5:302015-08-22T01:50:48+5:30
चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत घोट येथील महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ...

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनीच ठोकले शाळेला कुलूप
प्रमुख मागणी : भौतिकशास्त्राचे शिक्षक द्या
घोट : चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत घोट येथील महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अनेकदा प्राचार्यांकडे पाठपुरावा केला. मात्र शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारला थेट महात्मा गांधी शाळेला कुलूप ठोकले.
घोट येथील महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता १२ वीत एकूण ४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या अध्यापनासाठी जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे दीड महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. अनेकदा पाठपुरावा करूनही भौतिकशास्त्र विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षकाची नियुक्ती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
जोपर्यंत भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती होणार नाही, तोपर्यंत महात्मा गांधी शाळा बंदच ठेवण्यात येईल, असा इशारा शाळानायक अमोल खोबरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी काजल वैरागडे, सांस्कृतिक प्रतिनिधी अनिकेत अल्लेवार, क्रीडाप्रमुख विक्की चलाख, वर्ग उपनायक अमित वासेकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहे.