वसतिगृहातून विद्यार्थिनींना हाकलले
By Admin | Updated: July 24, 2016 01:38 IST2016-07-24T01:38:11+5:302016-07-24T01:38:11+5:30
येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातून काही विद्यार्थिनींना काढून टाकण्यात आले होते.

वसतिगृहातून विद्यार्थिनींना हाकलले
काँग्रेस आक्रमक : पोलीस ठाण्यावर दिली धडक; वाटाघाटीनंतर वसतिगृहात ठेवले
गडचिरोली : येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातून काही विद्यार्थिनींना काढून टाकण्यात आले होते. या प्रकाराची माहिती युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होताच त्यांनी थेट विद्यार्थिनींना घेऊन आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी परत या विद्यार्थिनींना वसतिगृहात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण शमले.
सत्र २०१६-१७ मध्ये शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला होता. २९ जूनला महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनी वसतिगृहात राहण्यास आल्या. २१ जुलै रोजी पर्यंत विद्यार्थिनींची जेवनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांना जेवनाची व सुरक्षेची सोय होणार नाही त्यामुळे वसतिगृहात राहता येणार नाही, असे सांगून वसतिगृहात काढून देण्यात आले. येथे राहणाऱ्या मुली अतिदुर्गम भागातील असल्याने या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. मात्र त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, असा आरोप युवक काँगे्रसने केला आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करीत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ येथे पाचारण केले. काँग्रेसने यावेळी आदिवासी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप-सेना सरकारचाही जोरदार निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना भ्रमणध्वनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी स्विचआॅफ होता. त्यानंतर सहायक प्रकल्प अधिकारी कुलकर्णी यांना संपर्क करण्यात आला. कुलकर्णी यांनी या मुलींना वसतिगृहातून काढण्यात आले. त्यांना परत राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे पोलीस ठाण्यात येऊन सांगितले. त्यानंतर काही वेळातच प्रकल्प अधिकारी व सहायक प्रकल्प अधिकारी कुलकर्णी हे पोलीस ठाण्यात आले व त्यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाला व पोलिसांना दिले. त्यानंतर या घटनाक्रमावर पडदा पडला. यावेळी शेकडोच्या संख्येत विद्यार्थिनी व काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमलेले होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल भडांगे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर आदी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.