खमनचेरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची अहेरी प्रकल्प कार्यालयावर धडक
By Admin | Updated: September 5, 2015 01:27 IST2015-09-05T01:27:46+5:302015-09-05T01:27:46+5:30
अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

खमनचेरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची अहेरी प्रकल्प कार्यालयावर धडक
सहा किमी पायी चालून आंदोलन : प्रकल्प अधिकाऱ्यांना दौरा सोडून यावे लागले
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी अहेरी प्रकल्प कार्यालयावर जोरदार धडक दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी भामरागडला गेले होते. मात्र विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच अहेरीत दाखल होऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्या जाईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांचा राग शांत झाला.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खमनचेरू येथे वसतिगृहात वार्डन नाही. आम्हाला दुसरी वार्डन मॅडम पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी असून जेवणात पोळी, वरण दिल्या जात नाही. तसेच सकाळी नाश्ता सुद्धा दिल्या जात नाही. भाजीला चव नसते, शौचालय बंद आहे, इयत्ता ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
वर्गखोल्यांना खिडक्या नाही, त्यामुळे पावसाळ्यात साप, विंचू व किटानू असे संस्थन प्राणी आत येतात. ११ वी कला शाखेच्या वर्गामध्ये पंखा नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशसुद्धा देण्यात आले नाही. ११ वी, १२ वी विज्ञान विषयासाठी गुंडावार शिक्षक पाहिजे, तसेच एस. ए. येलेकर यांना पाठविले. तर आम्ही शाळा सोडून जाणार आहो, अशी धमकीही विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी व खमनचेरूचे सरपंच यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
या निवेदनावर शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. खमनचेरू आश्रमशाळेचे विद्यार्थी सहा किमी अंतर पायी चालून प्रकल्प कार्यालयावर धडकले, हे विशेष. (वार्ताहर)