स्पर्धा परीक्षांच्या ‘तारीख पे तारीख’मुळे विद्यार्थी गाेंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:25+5:30
मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या ‘तारीख पे तारीख’मुळे विद्यार्थी गाेंधळात
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात काढू, असे आश्वासन मंत्र्यांकडून दिले जात असले तरी मागील दाेन वर्षांपासून एमपीएससीसह इतरही पदांच्या जागा निघाल्या नाहीत. विद्यार्थी केवळ आश्वासनांवर भराेसा ठेवून आहेत. जागा निघणार की नाहीत, याबाबत विद्यार्थी गाेंधळात सापडले आहेत.
मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, लिपीक, आराेग्य सेवक आदी पदेही रिक्त आहेत. ही पदेसुद्धा भरण्यात आली नाहीत. ग्रामीण भागातील अनेक युवक या परीक्षेच्या माध्यमातून नाेकरी मिळवितात. मात्र, या नाेकऱ्याही मिळवणे कठीण झाले आहे.
वय निघून चालले
एका निश्चित वेळी परीक्षा हाेणार आहे, असे गृहीत धरून अभ्यास केला जाते. मात्र, वेळाेवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा रिव्हिजन करावी लागत आहे. यामुळे निराशा येते. परीक्षा झाल्यानंतर मी शहरातील खाेली साेडून गावाकडे येईन, असे आई-वडिलांना सांगितले आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने शहरातच राहावे लागत आहे. त्यामुळे निराश झालो आहे.
- मंगेश माेहुर्ले, परीक्षार्थी
मागील दाेन वर्षाांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. एमपीएससीच्या तयारीसाठी शहरात राहून आर्थिक व मानसिक खच्चीकरण हाेत आहे. अधिक काळ तग धरणे शक्य नाही. शासनाने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. वय निघून जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
- अजय वेलादी, परीक्षार्थी
लाखाे रुपये खर्चून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सेटअप उभारण्यात आला. मात्र, मागील दीड वर्षांपासून काेराेनामुळे क्लासेस घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासूनच संस्था अडचणीत आली आहे. कर्ज घेऊन सेटअप उभारला आहे. कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. दीड वर्षात आलेले लाखाे रुपयांचे लाईटबिल भरण्यात आले आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास संस्था चालविणे कठीण हाेईल.
- संताेष बाेलूवार,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रप्रमुख
माेठ्या बॅनरचे अतिक्रमण
एमपीएससी मार्गदर्शन केंद्र माेठा बॅनर असलेल्या संस्था चालवित हाेत्या. काेराेनापूर्वी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, काेराेना कालावधीत अनेक संस्थांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. त्यामुळे युवक माेठ्या बॅनरचे क्लास करण्यास पसंती दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका लहान संस्थांना बसत आहे.