विद्यार्थी झोपतात वर्गखोलीत
By Admin | Updated: September 12, 2015 01:20 IST2015-09-12T01:20:19+5:302015-09-12T01:20:19+5:30
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही.

विद्यार्थी झोपतात वर्गखोलीत
लाहेरी आश्रमशाळेची विदारक परिस्थिती : रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
देवराव येरकलवार लाहेरी
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. विशेष म्हणजे पलंगाचा पुरवठा करण्यात आला नसल्याने जमिनीवरच झोपून रात्र काढावी लागत आहे.
भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने आश्रमशाळा सुरू केली. सदर आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने मागील वर्षी नवीन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीबरोबरच मुलींसाठी वसतिगृहाचीही इमारत बांधण्यात आली. मात्र मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. दिवसभर शिक्षण व रात्री त्याच वर्गखोलीत झोपण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. आश्रमशाळेची नवीन इमारत बांधून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी त्या इमारतीचा ताबा अजूनपर्यंत शाळेकडे देण्यात आला नाही. जुनी आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. सदर इमारत कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तीन वर्षांपूर्वी शाळेला विद्युत जनरेटर पुरविण्यात आले. मात्र डिझेलची व्यवस्था नाही. डिझेलसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चुन खरेदी केलेले जनरेटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. लाहेरी ते भामरागडचे अंतर १६ किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरून डिझेल कसे आणायचे हा सुद्धा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण होतो. त्यामुळे सदर जनरेटर अजूनपर्यंत सुरू सुद्धा झाले नाही. सोलर वॉटर हिटरचीही तीच परिस्थिती आहे. यावर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. स्वयंपाक घराभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलाची दुर्गंधी स्वयंपाक घरात येते. चिखलावर माशा घोंगावत असून त्या अन्नावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्रमशाळा इमारतीच्या परिसरात हातपंप असून सदर हातपंप चिखलाने वेढले आहे.
आश्रमशाळेतील या दुरावस्थेने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा ताबा आश्रमशाळा प्रशासनाकडे देऊन त्या ठिकाणी वर्ग सुरू करावे, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.