पेपरला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
By Admin | Updated: April 5, 2016 03:59 IST2016-04-05T03:59:27+5:302016-04-05T03:59:27+5:30
गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच

पेपरला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील पेपर अर्धा तासाने उशीरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देत आहेत. यासाठी विद्यापीठाने गडचिरोली जिल्ह्यात २३ व चंद्रपूर जिल्ह्यात ४१ परीक्षा केंद्र निर्माण केले असून या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे.
विद्यापीठाने पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने पेपर परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अवलंबिली आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पार पाडताना वेळेचे भान ठेवणे आवश्यक होते. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे पेपरच्या प्रिंट वेळेवर झाल्या नाही. त्यामुळे ९.३० वाजताचा पेपर गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १० वाजता सुरू झाला. अर्धा तास उशीरा पेपर सुरू झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. तालुकास्थळावरील काही परीक्षा केंद्रावर सुध्दा पेपर उशीराच सुरू झाला. (नगर प्रतिनिधी)
सीडीच्या पासवर्डसाठी पोलिसांच्या वॉकीटाकीचा वापर
४जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पध्दतीने पेपर पाठविता येणार नाही. याची पूर्व कल्पना विद्यापीठाला असल्याने अशा परीक्षा केंद्रांसाठी प्रश्नपत्रिकेच्या सीडी तयार करण्यात आल्या होत्या. या सीडी परीक्षा केंद्रावर अगोदरच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या सीडी पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन होत नाही. हा पासवर्ड अगदी परीक्षेच्या दिवशी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जातो. याची माहिती फोनद्वारे घेतली जाते. मात्र दुर्गम भागातील परीक्षा केंद्रांवरील फोनची यंत्रणा काम करीत नसल्याने पोलिसांच्या वॉकीटॉकीच्या माध्यमातून विद्यापीठाशी संपर्क साधून सीडीचे पासवर्ड मागविण्यात आले. त्यानंतर प्रिंट काढून पेपरला सुरूवात झाली. ही सर्व भानगड करताना काही परीक्षा केंद्रावर पेपर तब्बल एक ते दीड तास उशीरा सुरू झाला असल्याची माहिती आहे.
ढिसाळ नियोजनाने नावीन्यपूर्ण उपक्रमाला गालबोट
४विद्यापीठ स्तरावरून प्रश्नपत्रिकांचे गट्टे नेताना पेपर फुटण्याचा धोका असतो. राज्यात आजपर्यंत अशा प्रकारच्या शेकडो घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने आॅनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण व प्रसंशनीय उपक्रम यावर्षीपासून पहिल्यांदाच सुरू केला आहे. मागास जिल्ह्यातील विद्यापीठ असा ठपका असलेल्या विद्यापीठाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करून दाखविणे हे विद्यापीठासमोरील खरे आव्हान होते. मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाने हे आव्हान पेलता आले नाही व पहिल्याच दिवशी या उपक्रमाला गालबोट लागले.
परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा नवीन उपक्रम आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पेपर सुरू झाला. या तांत्रिक अडचणी दूर करून दुसरे पेपर वेळेवर सुरू होईल. यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे.
- डॉ. विनायक इरपाते, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली