विद्यार्थ्यांनो, परीक्षेची भीती दूर सारा!
By Admin | Updated: December 16, 2015 01:48 IST2015-12-16T01:48:37+5:302015-12-16T01:48:37+5:30
भीती ही अत्यंत वाईट असते, यशाचा मार्ग रोखण्यात भीतीचा मोठा वाटा राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना ...

विद्यार्थ्यांनो, परीक्षेची भीती दूर सारा!
अनिल गुंजाळ यांचे प्रतिपादन : ‘परीक्षेला सामोरे जाताना’ कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गडचिरोली : भीती ही अत्यंत वाईट असते, यशाचा मार्ग रोखण्यात भीतीचा मोठा वाटा राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना सर्वप्रथम परीक्षेबद्दलची असणारी भीती दूर सारून आत्मविश्वासाने परीक्षा दिल्यास हमखास यश मिळेलच, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ यांनी केले.
गडचिरोली येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसएससी परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिल गुंजाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. जे. आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. देवानंद कामडी, प्रा. शेषराव येलेकर, प्राचार्य सुनील पोरेड्डीवार, देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी मंगर, विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना अनिल गुंजाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अगदी शाळा सुरू झाल्यापासून अभ्यासाला सुरूवात करावी, त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत अभ्यासाचा ताण पडणार नाही. अभ्यास केव्हा करायचा, कधी करायचा, कसा करायचा याचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. अभ्यासाचा कंटाळा आल्यास काही वेळ विश्रांती घ्या.
अभ्यास हा मूळ पुस्तकातूनच करावा, गाईडसारख्या साधनांचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करावा, पुस्तकातून स्वत: नोटस् काढण्याची सवय लावावी, स्वत: प्रश्नपत्रिका तयार करून त्या सोडवाव्या याचा फायदा परीक्षेदरम्यान होतो. अभ्यास कमी झाला असल्यास गुण कमी पडतील या भीतीने परीक्षा टाळू नका. परीक्षेचा ताण मनावर येऊ न देता परीक्षा दिल्यास जास्तीत जास्त गुण आपोआप मिळतात, असे मार्गदर्शन अनिल गुंजाळ यांनी केले.
या कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील अनेक शाळांचे वर्ग दहावीचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)