आश्रमशाळेचे विद्यार्थी नाश्त्यावरच जातात परीक्षेला
By Admin | Updated: March 9, 2017 01:45 IST2017-03-09T01:45:53+5:302017-03-09T01:45:53+5:30
इयत्ता दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा जिल्हाभरात विविध केंद्रांवर सुरू आहे. मात्र आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालय नाशिक

आश्रमशाळेचे विद्यार्थी नाश्त्यावरच जातात परीक्षेला
आदिवासी विकास विभागाचे नवे वेळापत्रक
मालेवाडा : इयत्ता दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा जिल्हाभरात विविध केंद्रांवर सुरू आहे. मात्र आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची वेळ बदलविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत असलेल्या पेपरला आश्रमशाळेतील विद्यार्थी सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या नाश्तावरच केंद्रावर पोहोचत आहेत.
आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या १२ जानेवारी २०१७ च्या पत्रान्वये सकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रत्येक विद्यार्थ्याला १०० ग्रॅमचा नाश्ता दिला जात आहे. दुपारी १२.४५ ते १.४५ या वेळेत भोजनाची वेळ आहे. इयत्ता दहावी व बारावीचे आश्रमशाळेतील विद्यार्थी सकाळचा नाश्ता करून परीक्षा केंद्रावर पेपर सोडविण्यासाठी पोहोचत आहेत.
दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी भोजन करतात. त्यानंतर दुपारी ३.३० ते ४ या वेळेत विद्यार्थ्यांना फळ दिली जातात. रात्रीचे भोजन ७.३० ते ८ या कालावधीत दिले जाते. आदिवासी विकास विभागाच्या या नव्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या तिनही प्रकल्पातील शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची पंचाईत होत आहे. (वार्ताहर)