प्रगती पाहून विद्यार्थी भारावले
By Admin | Updated: September 6, 2016 00:57 IST2016-09-06T00:57:03+5:302016-09-06T00:57:03+5:30
महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात केलेली प्रगती बघून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी भारावून गेले असल्याचे ...

प्रगती पाहून विद्यार्थी भारावले
समारोपीय कार्यक्रम : ‘आपला महाराष्ट्र सहल’ योजनेची १३ वी फेरी
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात केलेली प्रगती बघून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी भारावून गेले असल्याचे समारोपीय कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतावरून दिसून येत होते.
गडचिरोली जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपला महाराष्ट्र सहल’ योजनेची १३ वी फेरी २५ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आली. ही मुले ५ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे परत आली. या निमित्ताने समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, आदिवासी विकास विभाग गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सहलीमध्ये अतिदुर्गम भागातील एकूण ८१ आदिवासी मुले- मुली सहभागी झाले होते. यामध्ये नक्षलपीडित व नक्षल सदस्यांचे नातेवाईकसुद्धा सहभागी होते. समारोपीय कार्यक्रमादरम्यान सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दर्शन सहलीने आनंद मिळाण्याबरोबरच खुप काही शिकविले. रेल्वे, मेट्रो रेल्वे, समुद्र, गेट वे आॅफ इंडिया हे सर्व पहिल्यांदाच बघून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये झालेली प्रगती थक्क करणारी आहे. गडचिरोली जिल्ह्याची ही एवढीच प्रगती करता येणे शक्य आहे. यासाठी आपण मोठे झाल्यानंतर प्रयत्न करू, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे यांनी मानले. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)