वेळेतील बदलाने विद्यार्थी गोंधळात
By Admin | Updated: February 4, 2017 02:21 IST2017-02-04T02:21:26+5:302017-02-04T02:21:26+5:30
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत १९ जानेवारी २०१७ ला परिपत्रक काढण्यात आले.

वेळेतील बदलाने विद्यार्थी गोंधळात
दिनचर्येवर परिणाम : आश्रमशाळांतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये तीव्र रोष
मालेवाडा : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत १९ जानेवारी २०१७ ला परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकानुसार आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे जेवण, तासिका व एकूणच दिनचर्येवर परिणाम झाल्याने आश्रमशाळांतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत परिपत्रक संबंधित शाळांना पाठविले. डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशींचा या परिपत्रकात समावेश आहे. या परिपत्रकानुसार शाळेची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ७.१० पर्यंत असून यात दुपारचे जेवण १.४५ पर्यंत तर सायंकाळचे जेवण रात्री ८.३० वाजेपर्यंत आहे. दोन्ही वेळच्या जेवणात सात तासांचा फरक आहे. तर रात्रीच्या जेवणानंतर १७ तासांनी दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
साधारणत: जेवणाच्या वेळेतील अंतर जवळपास सारखे असणे गरजेचे आहे. जीवशास्त्रानुसार सुद्धा यात समानता राखण्यात आली आहे. परंतु जीवशास्त्रीयदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या पाचनशक्तीचा विचार न करता वेळ निश्चित करण्यात आली आहे. सदर वेळा विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या असून विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही या बदलामुळे त्रस्त झाले आहेत. जेवणानंतर दुपारी १.४५ ते ३.३० पर्यंत तासिका आहेत. सकाळी ८ वाजेपर्यंत नाश्ता व दुपारी ४ वाजेपर्यंत अल्पोपहार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळेस निद्रा येऊ नये म्हणून मध्यंतरी जेवणाच्या व शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला होता. परंतु ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)