गृहपालाच्या स्थानांतरणाविरोधात विद्यार्थी एकवटले

By Admin | Updated: September 6, 2014 23:45 IST2014-09-06T23:45:55+5:302014-09-06T23:45:55+5:30

वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

Student mobilized against the transfer of the house | गृहपालाच्या स्थानांतरणाविरोधात विद्यार्थी एकवटले

गृहपालाच्या स्थानांतरणाविरोधात विद्यार्थी एकवटले

देसाईगंज : वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, गृहपालाचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे यासाठीही वसतिगृहातील विद्यार्थी एकवटले आहेत.
वसतिगृहातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र निवेदनाची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे शनिवारी दुसऱ्या दिवशी वसतिगृहाचे पाच विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात एकूण ६९ आदिवासी विद्यार्थी आहेत़ मागण्या मार्गी लावण्यासाठी वसतिगृहाचे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत़ पावसाचे दिवस असताना सुध्दा वसतिगृहाचे विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत़ उपोषणाचा शनिवारी दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी भेट दिलेली नाही़ वसतिगृहाचे गृहपाल डब्लू़ आऱ शेख यांचे प्रशासकीय स्थानांतरण रद्द करण्यात यावे, मागील २ महिण्यापासून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही तो त्वरीत देण्यात यावा, नवीन आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम शहराबाहेर ६ किमी अंतरावर सुरू आहे़ मुलींना शहराबाहेरच्या वसतिगृहात ये-जा करणे अतिशय अवघड होणार असल्यामुळे वसतिगृहाचे बांधकाम थांबविण्यात यावे, सन २०१४-१५ या सत्रातील गणेवशाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे या मागण्यांसाठी वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत़ या संदर्भात विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त नागपूर यांना २५ आॅगस्टला निवेदन दिले असून ३० आॅगस्ट रोजी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे़ मात्र अद्यापपर्यंत मागण्यासंदर्भांत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही़ या मागण्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अखेर उपोषणाचे अस्त्र उगारलेले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Student mobilized against the transfer of the house