विद्यार्थी प्रकल्प कार्यालयावर धडकले
By Admin | Updated: December 6, 2014 22:47 IST2014-12-06T22:47:30+5:302014-12-06T22:47:30+5:30
प्रलंबित देयकामुळे शासकीय वसतिगृहातील पुरवठा कंत्राटदारांनी वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज शनिवारी गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी

विद्यार्थी प्रकल्प कार्यालयावर धडकले
गडचिरोली : प्रलंबित देयकामुळे शासकीय वसतिगृहातील पुरवठा कंत्राटदारांनी वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज शनिवारी गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक देऊन रोष व्यक्त केला. संतप्त विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. कार्यालयात शेकडोच्या संख्येने घुसलेल्या या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल खाडे यांच्या नेतृत्वात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन आज आदिवासी विद्यार्थी संघाच्यावतीने प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाहभत्ता तत्काळ अदा करण्यात यावा, विद्यार्थ्यांसाठी असलेली बायोमॅट्रीक प्रणाली बंद करावी, प्रत्येक वसतिगृहात फिल्टर, वाटर हिटर उपलब्ध करून देण्यात यावे, ड्रेसकोडचे बिल त्वरीत मंजूर करावे, आश्रमशाळा वसतिगृहातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, पाठ्यपुस्तके उपलब्ध करावीत यासह विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर स्पष्टीकरण दिले. प्रकल्प कार्यालयाशी निगडित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी दौलत धुर्वे, विकेश आत्राम, संदीप वरखडे, चंद्रशेखर दुग्गा, नितेश किरंगे, भूजंग मडावी, अक्षपाल मडावी, जितेंद्र कुमरे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.