एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

By Admin | Updated: September 29, 2014 00:44 IST2014-09-29T00:44:36+5:302014-09-29T00:44:36+5:30

नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून

For ST's departmental office only | एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

गडचिरोली : नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून विभागीय नियंत्रकाचे पदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू करण्यात आले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे आगार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीबाबतचे स्वतंत्र निर्णय घेण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. त्यानंतर एसटीने गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू केले. या विभागीय कार्यालयांतर्गत तिनही आगाराचे मिळून जवळपास १ हजार कर्मचारी व ३०० एसटी बसेस आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. त्याचबरोबर एसटीचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा विभागीय कार्यालयाची आहे. हे लक्षात घेऊनच या कार्यालयात जवळपास ८० पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र सध्य:स्थितीत या कार्यालयात केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेत ७, आस्थापना विभागात ६ व अकॉऊंट विभागात २ असे एकूण केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी विभागीय नियंत्रक यांना १५ दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतांना अटक केली. त्यानंतर चवरे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून विभागीय नियंत्रकाचे पद रिक्त झाले आहे. मुख्य अधिकारीच नसल्याने याबाबतचे निर्णय घेण्यास सुद्धा अडचण जात आहे.
विभागीय कार्यालय सुरू केले असले तरी या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे आगारातील एका खोलीतून विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या अखत्यारिमध्ये वर्कशॉप व स्टोअर असणे गरजेचे आहे. मात्र हे दोन विभाग गडचिरोली येथे आणण्याबाबतचा अजून कोणताच निर्णय एसटीने घेतला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाले असले तरी एसटी वाहनामध्ये बिघाड निर्माण झाल्यास सदर वाहन चंद्रपूर येथील वर्कशॉपमध्येच नेऊन दुरूस्त करावे लागते. त्याचबरोबर साहित्य सुद्धा चंद्रपूर येथूनच आणावे लागत असल्याने विभागीय कार्यालयाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: For ST's departmental office only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.