राजोलीवासीयांचा सुविधांसाठी संघर्ष
By Admin | Updated: December 24, 2015 02:03 IST2015-12-24T02:03:33+5:302015-12-24T02:03:33+5:30
तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजोली गावात स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही पक्के रस्ते तयार झाले नाही.

राजोलीवासीयांचा सुविधांसाठी संघर्ष
रस्ता हवा, बस हवी : नदीवरचा पूल पुरात वाहून गेला
धानोरा : तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजोली गावात स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही पक्के रस्ते तयार झाले नाही. परिणामी महामंडळाची बसही येत नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्या कायम आहेत. परिणामी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे राजोली गाव विकासापासून कोसो दूर आहे.
राजोली गावाजवळून वाहणाऱ्या कठाणी नदीमुळे पुलांअभावी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तालुका व जिल्हा मुख्यालयाशी तुटतो. राजोली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर कठाणी नदीवर चार वर्षांपूर्वी लाखो रूपये खर्च करून पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे व नियोजनबद्ध पद्धतीने न झाल्यामुळे दोन वर्षातच पुराच्या पाण्यामुळे सदर पूल वाहून गेला. तेव्हापासून या पुलाची संबंधित विभागाने दुरूस्ती केली नाही. तसेच याठिकाणी नवा पूल उभारलाही नाही. नव्या सरकारने राजोली गावाच्या मार्गावर नवा पूल बांधकामासाठी २३ लाख रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती ग्रामस्थांना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात येथे नव्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. गावातील समस्यांबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. मात्र गावाच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे.